- राजकुमार जाेंधळेलातूर - कृषिमंत्री माणिकराव काेकाटे यांच्या राजीनाम्यासाठी लातुरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमाेर मंगळवारी दुपारी २ वाजता छावा संघटनेच्या एका कार्यकर्त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाेलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आणि त्याचे समुपदेशन केले. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली असून, त्यास सायंकाळी साेडून देण्यात आले.
पाेलिसांनी सांगितले की, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ छावा संघटनेचा कार्यकर्ता कृष्ण शत्रुघ्न धाेंडगे (वय २५) याने लातुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासामाेर ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राज्याच्या कृषिमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, ॲड. घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाण प्रकरणात कडक कारवाई झालीच पाहिजे, आदी मागण्या करत कृषिमंत्र्यांविराेधात त्यांनी घाेषणाबाजी केली. यावेळी एमआयडीसी ठाण्याच्या पाेलिसांनी धाव घेत कार्यकर्त्याला ताब्यात घेतले. त्यास ठाण्यात आणल्यानंतर पाेलिसांकडून समुपदेशन करण्यात आले. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली असल्याचे पाेलिस निरीक्षक समाधान चवरे म्हणाले.