लातूर - लातूर-अंबाजोगाई मार्गावर पिंपळफाळ्यानजीक रस्त्यावर वीट भरून उभा असलेल्या ट्रॅक्टरवर भरधाव आलेली बस धडकली. यात घटनेत बसचालकाचा मृत्यू झाला असून ११ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील दोघेजण गंभीर जखमी असल्याने तात्काळ लातूरला हलविण्यात आले आहे. ही घटना रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.पिंपळफाट्यापासून जवळपास १ किलोमीटर अंतरावर एका हॉटेलसमोर लातूर विभागाची अंबाजोगाईहून लातूरकडे निघालेली बस क्र.एमएच २० बीएल १०५३ ही रस्त्यावर वीट भरून उभ्या असलेल्या ट्रॅक्टर क्र. एमएच २८ एजे १२८४ ला पाठीमागून जोरदार धडक दिली. घटनेत बसचालकासह ११ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक धावून आले. तसेच पोलिसांना ही माहिती देण्यात आली. तात्काळ पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी नागिरकांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना रूग्णवाहिका व खाजगी वाहनांच्या साह्याने रेणापूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचार गंभीर जखमी व इतरांना लातूरला हलविण्यात आले आहे. दरम्यान, बसचालक विठ्ठल साधूराम हराळे (५७, रा.जकेकुर, ता. उरमगा, जि. उस्मानाबाद) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना रूग्णालयात दाखल करेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, सपोनि. श्रीराम माचेवाड, पोउपनि. नागसेन सावळे, बीट अंमलदार राजकुमार गुळभिले यांनी भेट देऊन पंचनामा केला. अपघातातील जखमींना लातूर येथे रूग्णालयात पाठविण्यासाठी संगायोचे तालुकाध्यक्ष गोविंद पाटील व त्यांच्या सहकारी मित्रांनी प्रयत्न केले.
जखमी प्रवाशांना लातूरला हलविले...अपघातात जखमी झालेले बसमधील प्रवासी मारोती गणेश परके (रा.नांदेड), श्रीकांत श्रीगोपाल सारडा (सोनपेठ, जि. परभणी), सरस्वती गणेश पोपलाईट (सिध्देश्वर नगर, लातूर), ज्ञानेश्वर बिभीषण मुंडे, स्वारता सुरवसे (अंबाजोगाई), शिवाजी सोपान कटके, राजेश शिवाजी कटके, नंदाबाई उत्तमराव कटके , सुरेखा जनार्दन हातोलकर (रा. दर्जी बाेरगाव, ता. रेणापूर) यांना रेणापूरच्या ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून लातूरला हलविण्यात आले आहे. तसेच मजहर अली, रामसिंग कडाएत यांच्या पायाला गंभीर मार लागला आहे, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे ग्रामीण रूग्णालयाचे डॉ.शेख यांनी सांगितले.