लातूर : खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लातूर शहरातील विकासनगर येथील चौघांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अक्षय सूर्यवंशी, राहुल ढेंगळे, अनिकेत बनसोडे आणि शुभम गायकवाड या चौघांनी फिर्यादी रमेश शंकरराव माने (रा.विकासनगर, लातूर) यांना शिवीगाळ केली होती. या प्रकरणी फिर्यादीने या चौघांच्या वडिलांना याबाबत कल्पना दिली. मात्र, आरोपींनी, तू आमच्या वडिलांना का सांगितले, म्हणून १५ डिसेंबर, २०१८ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरात घुसून मारहाण केली. फिर्यादीच्या पोटात चाकू भोसकला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस.आर. मुंढे यांनी केला. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने ६ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या.
फिर्यादी, तसेच फिर्यादीची पत्नी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरला. सुनावणीअंती प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एस. तिवारी यांनी सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपी अक्षय सूर्यवंशी, राहुल ढेंगळे, अनिकेत बनसोडे, शुभम गायकवाड यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अभियोक्ता एस.व्ही. देशपांडे यांनी बाजू मांडली.