लाेकमत इफेक्ट : राजकुमार जाेंधळे, महेश पाळणे, लातूर: जिल्हा क्रीडा संकुलातील नव्याने होत असलेल्या ओपन जीमच्या कामाची अवस्था वाईट होती. फाउंडेशन कच्चे झाल्याने त्या ठिकाणी बसणाऱ्या व्यायामाचे साहित्य किती दिवस टिकेल हे सांगता येत नव्हते. याबाबत मंगळवारी ‘लोकमत’ने प्रकाश टाकत हे प्रकरण पुढे आणले होते. याची दखल घेत प्रशासनाने ब्रेकरने खड्डे करीत त्यात परिपूर्ण सिमेंट भरीत फाउंडेशन मजबूत केले आहे.
जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलसमोरील महिलांची ओपन जीम गेल्या अनेक दिवसांपासून मोडकळीस आली होती. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी क्रीडा संकुलाची पाहणी केली असता त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने या ओपन जीमची दुरुस्ती करीत नवीन साहित्य बसविण्याच्या सूचना केल्या. या अनुषंगाने गेल्या दोन दिवसांपासून फाउंडेशनचे काम सुरू होते. मात्र, या कामात मजबुती दिसून आली नाही.
आवश्यक व गुणवत्तेनुसार काम होणार...
याबाबत मंगळवारी वृत्त प्रकाशित होताच जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी क्रीडा विभागाला हे काम उत्तम होण्याच्या सूचना दिल्या. आवश्यक व गुणवत्तेनुसारच काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नव्याने उभारण्यात येणाऱ्या या ओपन जीमचे काम मजबूत व परिपूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी क्रीडा विभागाला दिल्याने मंगळवारी मजबुतीकरणाला सुरुवात झाली.
११ खड्डे केले दुरुस्त...
या ओपन जीमसाठी अकरा खड्डे करण्यात आले होते. त्याठिकाणी फाउंडेशनचेही काम झाले होते. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मंगळवारी हे फाउंडेशन काढून ब्रेकरने मोठे खड्डे करण्यात आले व या ठिकाणी सिमेंटचे मजबूत काँक्रिट करण्यात आले. खड्डा व्यवस्थित होत नसल्याने गुत्तेदारांनी भागवाभागवी करीत कामकाज केले होते. मात्र मंगळवारी गुत्तेदाराला सूचना करीत क्रीडा विभागाने याची दुरुस्ती केली. या ठिकाणी काँक्रिटला पाणी मारण्यासाठी आळेही करण्यात आले आहे.
गुत्तेदाराला दिल्या सूचना...
खड्डा व्यवस्थित खंदला जात नव्हता. त्यामुळे अडचण होती. मंगळवारी गुत्तेदाराला सूचना करीत कामात सुसूत्रता आणली व मजबूत काम करण्याच्या सूचनाही गुत्तेदाराला केल्या असल्याचे क्रीडा विभागामार्फत सांगण्यात आले.