अस्थिविसर्जनाचाही प्रश्न
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाहेर फिरण्यास मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. त्यामुळे अनेकजण स्मशानातून अस्थी घेऊन जात नाहीत. त्यामुळे स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच राख जमा करावी लागत आहे.
सार्वजनिक स्मशानभूमी, चाकूर
चाकूर येथील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये कोरोनाच्या संकटकाळात अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अंत्यसंस्काराला मोजकेच नातेवाईक येत आहेत. अंत्यसंस्कारानंतर राख सावडणे हा कार्यक्रम असतो. याकडे बहुतांश नातेवाईक पाठ फिरवत आहेत. परिणामी, राख स्मशानभूमीत साठून आहे.
सार्वजनिक स्मशानभूमी, रेणापूर
रेणापूर येथील सार्वजनिक स्मशानभूमीत ३० ते ३५ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सध्या या संख्येत घट झाली आहे. स्मशानभूमी यंत्रणेच्या वतीने राखेचे योग्य पद्धतीने विसर्जन करण्यात आले आहे. त्यामुळे राख शिल्लक नाही. नातेवाईकांनाही राख घेऊन जाण्यासाठी सांगितले जात आहे.
सार्वजनिक स्मशानभूमी, अहमदपूर
अहमदपूर शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर नगरपालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अंत्यसंस्कारानंतर संबंधित नातेवाईकांना राख घेऊन जाण्यास सांगितले जाते. मात्र, अनेक नातेवाईक याकडे पाठ फिरवत आहेत. स्मशानभूमीत राख शिल्लक असून, एका बाजूला जमा करून ठेवण्यात आली आहे.
काय म्हणतात, स्मशानभूमीतील कर्मचारी
अंत्यसंस्कारानंतर जे नातेवाईक राख घेऊन जात नाहीत, ती राख स्मशानभूमीत साठवून ठेवली जाते. मागील महिन्यात जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता त्यामध्ये घट झाली आहे.
- सुभाष मुकुटमोरे, चाकूर
रेणापूर स्मशानभूमीत अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व राख नेण्याची प्रथा असल्यामुळे राख शिल्लक नाही. कोरोनाच्या संकटकाळात रेणापूर नगरपंचायतीकडून ३५ हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. राख शिल्लक राहत नाही.
- अंकुश गायकवाड, रेणापूर
अहमदपूर येथील स्मशानभूमीमध्ये अनेक नातेवाईक अंत्यसंस्कारानंतर राख नेत नाहीत. त्यामुळे राख मोठ्या प्रमाणात जमा झाली आहे. स्मशानभूमीच्या एका बाजूला राख जमा करून ठेवण्यात आली आहे.
- माधव पानपट्टे, अहमदपूर