शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच
लातूर : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, दररोज दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. शहरातील क्रीडा संकुलासह घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना गत दोन दिवसांपूर्वी घडली आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी लातूर शहरातील नागरिकांमधून होत आहे.
शहरातील महात्मा गांधी चौकात जनआंदोलन
लातूर : ग.दि. माडगूळकर यांचे स्मारक उभारावे, या मागणीसाठी सोमवारी महात्मा गांधी चौकात जनआंदोलन करण्यात आले. यावेळी डाॅ. संजय जमदाडे, डाॅ.एस.एस. कुलकर्णी, बंकट पुरी, प्रकाश घादगिने, अभय करंदीकर, ॲड. मुकेश कोळपकर, प्रा.डाॅ. राजशेखर सोलापुरे, देवीकुमार पाठक, प्रा.डाॅ. जयद्रथ जाधव, प्रा.डाॅ.दुष्यंत कटारे, शैलजा कारंडे, प्रा. नयन राजमाने, विजय भणगे, वृषाली पाटील उपस्थित होते.
खंडित वीज पुरवठ्याचा रबी पिकांना फटका
लातूर : जिल्ह्यात रबी हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा मुबलक पाणी असल्यामुळे जवळपास ३ लाख २० हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. पिकांसाठी पाणी आवश्यक असून, महावितरणच्या वतीने रात्री वीज पुरवठा केला जात आहे. त्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचा फटका रबी हंगामातील पिकांना बसत आहे.
सिमेंट रस्त्याची दुरवस्था
लातूर : लातूर शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौकापर्यंत सिमेंट रोडची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
भाजीपाल्याचे दर घसरले
लातूर : जिल्ह्यातील भाजीपाला बाजारात आवक वाढली असल्याने भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. सध्या मेथी, पालक, शेपू, टोमॅटो, फुलगोबी, पत्ताकोबीची आवक होत असल्याचे चित्र आहे. मेथी, शेपू, कोथिंबीर, पालक आदी भाज्या १० रुपयाला दोन पेंढी मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
मनपाच्या वतीने शहरातील रस्त्यांची स्वच्छता
लातूर : शहर महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छ लातूर-सुंदर लातूर’ या संकल्पनेतून शहरातील विविध रस्त्यांची स्वच्छता केली जात आहे. गंजगोलाई, अंबाजोगाई रोड, बार्शी रोड आदी मुख्य रस्त्यावर स्वच्छता मोहीम रात्रीच्या वेळी राबविली जात आहे. तसेच शहरातील विविध भागांत कचरा संकलनासाठी नियमितपणे घंटागाडी पाठविली जात आहे.