लातूर : ‘लोकमत रक्ताच नातं’ या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात एकूण १,५३८ जणांनी रक्तदान केले. यामध्ये ‘लोकमत’सोबत अनेक संस्था, संघटनांनी सहभाग नोंदवला. दरम्यान, रविवारी झालेल्या लोकमत व आरसीसी क्लासेसच्या संयुक्त शिबिरात ८९ जणांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्या हस्ते झाले. यावेळी परिविक्षाधिन आयएएस अधिकारी जितेन रहेमान, आरसीसीचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर, मीनल मोटेगावकर, उद्योग भवनचे संचालक रमेश भुतडा, तुकाराम पाटील, संतोष बिराजदार उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनीही रक्तदान केले. प्रास्ताविकात ‘लोकमत’चे वृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे यांनी जिल्ह्यात एकूण २९ शिबिरांत रक्तदान केलेल्या १,५३८ रक्तदाते व सहभागी संस्था, संघटनांना धन्यवाद दिले. वरिष्ठ शाखा व्यवस्थापक नितीन खोत यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रशांत सूर्यवंशी व मंंदाकिनी शेटकार यांनी केले. यावेळी संजीवनी रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी बालाजी जाधव, डॉ. माधव झिल्हे, गोविंद जाधव, विनायक सावंत, बंडू मस्के, धोंडीराम माने, आत्माराम माने, विशाल सावंत, बलभीम चव्हाण, राणी कावळे, लक्ष्मी अडसुळे, राणी जोगदंड, माधुरी, करिष्मा, अंबिका मिटकरी, अंबिका जोशी, मेघा येडके, राेहिणी कातळे यांनी परिश्रम घेतले.
‘लोकमत’ची भूमिका मोलाची - आयुक्त मित्तल
यावेळी मनपा आयुक्त अमन मित्तल म्हणाले, रक्तदान मोहिमेत ‘लोकमत’ची भूमिका मोलाची आहे. कोरोनाकाळात गरजूंना दिलासा मिळाला आहे. याच धर्तीवर ‘लोकमत’ने लातूर शहरात जलपुर्नभरण आणि वृक्षारोपण कार्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रा. शिवराज मोटेगावकर म्हणाले, ‘लोकमत’ने जिल्हाभरात दीड हजार रक्तदात्यांना प्रेरणा दिली. शिक्षणात अग्रेसर राहिलेले लातूर सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले. जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन सामाजिक एकता निर्माण करणारी मोहीम ‘लोकमत’मुळे शक्य झाल्याचे ते म्हणाले.