जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीलाच महावितरण कारभाराचा निषेध व्यक्त करत यापूर्वी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत महावितरण अधिकाऱ्यांना आदेश देऊनही अद्याप ज्या शेतकऱ्यांनी विद्युत डीपीची मागणी केली आहे, त्यांना डीपी मिळाली नसल्याची तक्रार भाजपा लोकप्रतिनिधींनी केली. आधीच चढ्या दराने काळ्याबाजारातून शेतकऱ्यांना बियाणे व खते खरेदी करावी लागली आहेत. सध्या पावसाने ओढ दिली असून, हातातोंडाशी आलेल्या खरिपाच्या पिकाचा घास हिरावून घेण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतात पाणी असूनही विजेअभावी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. विद्युत डीपी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने वीज मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. विद्युत डीपीसाठी महावितरण कार्यालयात खेटे घालूनही अधिकारी वर्ग डीपी उपलब्ध करून देत नाहीत, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रारही केलेली आहे. याबाबत मागील बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख यांनी महावितरणने आपल्या कारभारात सुधारणा करून तात्काळ ज्या शेतकऱ्यांनी विद्युत डीपीची मागणी केली आहे, त्यांना डीपी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश दिलेले होते. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतरही महावितरणने आपल्या कारभारात सुधारणा केलेली नसून. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी विद्युत डीपीच्या प्रतीक्षेत आहेत. ऑइल उपलब्ध नसल्याने डीपी दिली जात नाही, अशी सबब महावितरण अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगताच माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. आ. निलंगेकरांना जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, खा. सुधाकर श्रृंगारे, आ. अभिमन्यू पवार व जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्यासह भाजपा सदस्यांनी पाठबळ देत शासन व प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.
शेतकरी हितासाठी भाजपा बांधील...
शेतकरी हितासाठी भाजपा बांधील असून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात डीपी बसणार नाही, तोपर्यंत भाजपा आगामी शासकीय बैठकांवर बहिष्कार घालत असल्याचे सांगत भाजपा सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरही बहिष्कार टाकत सभागृहाच्या बाहेर पडले. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी शासनाच्या व प्रशासनाच्या या धोरणाचा निषेध व्यक्त केला. तसे याबाबत ठोस कार्यवाही नाही झाल्यास भाजपाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही आ. निलंगेकरांनी यावेळी दिला.