भाग्यश्री फंडने गाजविला उदगीरात राज्यस्तरीय कुस्तीचा फड

By हरी मोकाशे | Published: March 11, 2024 07:07 PM2024-03-11T19:07:54+5:302024-03-11T19:08:19+5:30

खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा : संजना बागडी, आश्लेषा बागडे, गौरी पाटील यांचीही सोनेरी कामगिरी

Bhagyashree Fund wins state level wrestling in Udgir | भाग्यश्री फंडने गाजविला उदगीरात राज्यस्तरीय कुस्तीचा फड

भाग्यश्री फंडने गाजविला उदगीरात राज्यस्तरीय कुस्तीचा फड

उदगीर (जि. लातूर) : महाराष्ट्र केसरी किताबची मानकरी असलेल्या भाग्यश्री फंड हिने आपल्या गटात निर्विवाद वर्चस्व गाजवित खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा फड गाजविला. त्याचबरोबर संजना बागडी, आश्लेषा बागडे, गौरी पाटील यांनीही आपापल्या वजनी गटात बाजी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचलनालयाच्या वतीने येथील तालुका क्रीडा संकुलात ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सुरू आहे. श्रीगोंद्याच्या (जि. नगर) भाग्यश्री फंड हिने ६२ किलो गटातील अंतिम लढतीत सांगलीच्या पुजा लोंढेला पहिल्या फेरीतच लोळविले. त्यामुळे तिने सुवर्णपदक जिंकले. पुजा लोंढे रौप्यपदकाची मानकरी ठरली. साताऱ्याच्या सिद्धी कणसेने कांस्यपदकाची कमाई केली.

महिलांच्या ७२ किलो गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत सांगलीच्या संजना बागडी हिने लातूरच्या आराधना नाईकचा पराभव केला. आराधनाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. साताऱ्याची प्रिती पाटील व नगरची सोनिया सरक यांना कांस्यपदके मिळाली. ५७ किलो गटात साताऱ्याची आश्लेषा बागडे व लातूरची अंकिता जाधव यांच्यात तोडीस तोड लढत झाली. लढत २-२ अशी बरोबरीत असताना आश्लेषाने चितपट कुस्ती मारून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. पिंपरी-चिंचवडची निर्मिती मुन्हे व कोल्हापूर शहरची श्रद्धा कुंभार यांनी कांस्यपदकांची कमाई केली. ५३ किलो गटात कोल्हापूरच्या गौरी पाटीलने कोल्हापूरच्याच तृप्ती गुट्टा हिला धूळ चारत सुवर्णपदकाची कमाई केली. सेजल धरपळे, पल्लवी बागडी यांना कांस्यपदके मिळाली. विजेत्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, क्रीडा उपसंचालक उदय जोशी, युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदींची उपस्थिती होती.

श्रीकांत, सुरज, पार्थ, ओंकार, राकेश, सतीशला सुवर्णपदक...
खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या पुरूष विभागात कोल्हापूरचा सुरज अस्वले व नाशिकचा पवन डोन्नर यांच्यातील लढत लक्ष्यवेधी ठरली. त्यात सुरजने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले. पवनला रौप्यपदक, कोल्हापूरचा विजय डोंगरे व पुणे शहरचा अमोल वालगुडे यांना कांस्यपदक मिळाले. ६० किलो गटात कोल्हापूरच्या श्रीकांत कामण्णने सोलापूरच्या आकाश सरगरचा पराभव करीत सुवर्णपदक मिळविले. आकाशला रौप्य तर नाशिकच्या अतुल मेदडे व कोल्हापूरचा प्रतिक पाटील यांना कांस्यपदक मिळाले. ६७ किलो गटात पुणे शहरच्या पार्थ कंधारेने जळगावच्या अरबाज पठाणचा धुव्वा उडवून सुवर्णपदक पटकाविले. अरबाजला रौप्य, पुणे जिल्ह्याचा वैष्णव आडकर व कोल्हापूरचा माऊली टिपुगडे यांनी कांस्यपदके जिंकले. ७२ किलो गटात कोल्हापूरच्या ओंकार पाटीलने सोलापूरच्या किरण सत्रेचा पराभव करीत सुवर्णपदक जिंकले. किरणला रौप्यपदक तर नाशिक जिल्ह्याचा पार्थ कमाळे व सांगलीचा जयदीप बडरे हे कांस्यपदकाचे मानकरी ठरले. ७४ किलो गटात कोल्हापूरच्या राकेश तांबुळकरने कोल्हापूरच्याच अभिजीत भोसलेचा पराभव करीत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. पुणे जिल्ह्याचा अनिल कचरे व कोल्हापूरचा सातपा हिरगुडे यांना कांस्यपदके मिळाली. ९७ किलो गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत सांगलीच्या सतीश मुंढेने कोल्हापूरच्या रोहन रेडेचे आव्हान मोडीत काढले. रोहनला रौप्यपदक, सोलापूरचा निकेतन पाटील व लातूरचा योगीराज नागरगोजे यांना कांस्यपदके मिळाली.

Web Title: Bhagyashree Fund wins state level wrestling in Udgir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.