लातूर : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा ‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’ पुरस्कार यावर्षी लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाला जाहीर झाला आहे. रासेयोच्या सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कारासाठीही याच महाविद्यालयाच्या डॉ. कल्याण सावंत यांची निवड झाली आहे. केंद्र शासनाच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे महाविद्यालय आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत नि:स्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजसेवा केल्यामुळे राजर्षी शाहू महाविद्यालयाची सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून निवड करण्यात आली आहे. महाविद्यालयातील रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. कल्याण सावंत यांच्या सामाजिक उपक्रमाची दखल शासनाकडून घेण्यात आली असून, त्यांचीही ‘सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी’ म्हणून निवड करण्यात आली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य डॉ. ए. जे. राजू, उपप्राचार्य सदाशिव शिंदे, उपप्राचार्य सुचेता वाघमारे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. कल्याण सावंत यांचे संस्थेच्यावतीने संस्थाध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, ॲड. सुनील सोनवणे यांनी कौतुक केले.
राजर्षी शाहू महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:22 IST