पाच नंबर चौक येथून दुचाकीची चोरी
लातूर : पाच नंबर चौकातील एका हॉटेलसमोर पार्किंग केलेल्या एमएच २४ वाय ३७४१ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना २८ जुलै रोजी घडली. याबाबत जबार यासिन शेख (रा. वाल्मिकीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विनाकारण शिवीगाळ करून मारहाण
लातूर : दुकानावर काम करीत असताना विनाकारण शिवीगाळ करून फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना खोरे गल्ली येथे घडली. याबाबत सलीम सखावत खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद सिराज व अन्य एकाविरुद्ध (दोघेही रा. खोरे गल्ली) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भताने करीत आहेत.
कपाटाचे लॉकर तोडून २० तोळे चांदी, रोख रक्कम चोरीला
निलंगा : शहरातील दत्तनगर येथील हैदर रौफ कादरी यांच्या घरातील कपाटाचे लॉकर तोडून २० तोळे चांदीची चेन तसेच रोख १० हजार असा एकूण १६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना २७ जुलै रोजी घडली. याबाबत कादरी यांच्या फिर्यादीवरून निलंगा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उदगीर येथून दुचाकीची चोरी
उदगीर : उदगीर येथील रोहन रमेश बिराजदार यांची एमएच २४ एक्यू ०४९६ या क्रमांकाची घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. याबाबत उदगीर शहर पोलिसांत रोहन बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मडोळे करीत आहेत.
वागदरी शिवारातून ८०० फूट वायर चोरीला
रेणापूर : रेणापूर तालुक्यातील वागदरी शिवारातील गट नं. ९२ मधील बोअरचे इलेक्ट्रिकल थ्री फेज ८०० फूट वायरची चोरी झाल्याची घटना २८ जुलै रोजी घडली. याबाबत उत्तरेश्वर अंतराम गंभिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.
रेणापूर येथून दुचाकीची चोरी
रेणापूर : येथील गांधी चौकात पार्किंग केलेल्या एमएच २४ एडी २१२६ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत प्रेमदास किशन राठोड (रा. हणमंतवाडी, ता. रेणापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बटईने दिलेली शेती काढून का घेतली म्हणून मारहाण
लातूर : ‘तुझ्या वडिलांनी आम्हाला बटईने दिलेली शेती तू का काढून घेतलीस?’ म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सारसा शिवारात घडली. काठीने हातावर मारून अंगठ्याशेजारील दोन्ही बोटे फ्रॅक्चर केली व जिवे मारण्याची धमकी दिली, असे विवेकानंद उत्तमराव शिंदे (रा. कारसा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गातेगाव पोलीस ठाण्यात व्यंकट नारायण शिंदे व अन्य तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नवले करीत आहेत.
ट्रकवरील ताडपत्री फाडून औषधांची चोरी
लातूर : मुरुड येथे एमएच २४ एव्ही ६६६७ या क्रमांकाच्या ट्रकवरील निळ्या रंगाची ताडपत्री फाडून नऊ औषधांचे बॉक्स चोरल्याची घटना सोमवारी (दि. २६) घडली. याबाबत शिवशंकर विश्वास जाधव (रा. मुरुड, ता. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध मुरुड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सय्यद करीत आहेत.
तुम्ही शेतात का आलात म्हणून मारहाण
लातूर : ‘फिर्यादीचे शेत असताना तुम्ही शेतात का आलात, हे शेत मी करणार आहे,’ असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मळवटी शिवारात घडली. याबाबत शबीरखाँ फकीरखाँ पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात महेब शबीरखाँ पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार सय्यद करीत आहेत.
शिवीगाळ करून मारहाण
लातूर : गंगापूर येथे शिवीगाळ करून फिर्यादीला मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत तिघांविरुद्ध लातूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी लक्ष्मण उत्तम दंडिमे घरात बसले असता आरडाओरड कशाची होत आहे हे पाहण्यास ते बाहेर आले असताना त्यांना शिवीगाळ झाली. काठीने डोक्यात मारून त्यांना जखमी केले. भाऊ, पत्नी व आई-वडिलांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे लक्ष्मण उत्तम दंडिमे यांनी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कृष्णा बब्रुवान चिवडे व अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.