एसटीच्या मालवाहतूक सेवेला प्रतिसाद
लातूर : कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. परिणामी, उत्पनाचे साधन निर्माण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला उद्योजक, व्यावसायिक, खत विक्रेते यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लातूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात विविध मालाची वाहतूक केली जात आहे. या माध्यमातून एसटी महामंडळाला चांगले उत्पन मिळत आहे. लातूर विभागात निलंगा, औसा, उदगीर, अहमदपूर आणि लातूर या पाच आगारांचा समावेश होतो.
माठ खरेदीला ग्राहकांची पसंती
लातूर : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, गरिबांचे फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ शहरातील विविध भागात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. गंजगोलाई, गूळ मार्केट, दयानंद गेट परिसर, रेणापूर नाका, औसा रोड आदी भागात माठ विक्रीसाठी दुकाने थाटली आहे. विविध प्रकारचे आकर्षक माठ विक्रीसाठी दाखल झाले असल्याने खरेदीला नागरिकांची पसंती दिसून येत आहे. आगामी काळात माठाच्या मागणीत वाढ होईल, असे शहरातील विक्रेत्यांनी सांगितले.
रेणापूर नाका परिसरात स्वच्छतेची मागणी
लातूर : शहरातील रेणापूर नाका परिसरात असलेल्या नवीन वसाहतीमध्ये नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. वेळेवर कचरा संकलन केले जात नसल्याने रस्त्याच्या कडेला, मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याकडे शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने तात्काळ लक्ष देऊन नियमित घंटागाडी सुरू करण्याची मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नपत्रिकेचे वाटप
लातूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या शाळा, महाविद्यालये बंद आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करावा लागत आहे., विद्यार्थ्यांचा सराव व्हावा यासाठी लातूर शहरातील शाळांच्या वतीने विद्यार्थ्यांना सर्व प्रश्नसंचांचे वितरण केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत होणार असून, घरच्या घरीच सराव होणार असल्याचे शाळांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
महावितरणच्या वतीने वीजबिल वसुलीसाठी मोहीम
लातूर : महावितरणच्या लातूर परिमंडलाच्या वतीने वीजबिल वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. लातूर मंडळात बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. अनेकांनी वीजबिल भरले नसल्याने महावितरणच्या वतीने वीज पुरवठा खंडित केला जात आहे. अनेकजण बिल भरून महावितरणला सहकार्य करीत आहेत. ज्यांच्याकडे वीजबिल थकीत आहे, त्यांनी आपल्या जवळील बिल भरणा केंद्रात थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन लातूर परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
हमीभाव खरेदी केंद्रावर अल्प प्रतिसाद
लातूर : जिल्ह्यात शासनाच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र, हमीभाव खरेदी केंद्रापेक्षा बाजारात शेतीमालाला अधिक भाव मिळत असल्याने हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. सोयाबीनला ३ हजार ८७० रुपयांचा हमीभाव असून त्या तुलनेत बाजारात ४५०० पेक्षा अधिकचा दर मिळत असल्याचे चित्र आहे. यासोबतच बाजार समितीत अधिकचा दर भेटत असल्याने लातूर बाजार समितीत शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत बाजार समितीत व्यवहार पार पाडले जात आहेत.