देवणीच्या ग्रामीण रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने येथील एका स्त्रीरोगतज्ज्ञाची काही दिवसांसाठी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्ती केली होती. विशेष म्हणजे, येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञाची आवश्यकता असतानाही ही प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. तेथील त्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर तेथून सदरील तज्ज्ञ डॉक्टरास कार्यमुक्त करण्यात आले. परंतु, सदरील तज्ज्ञ येथील ग्रामीण रुग्णालयात रूजू होण्यास तयार होत नाही.
वास्तविक पाहता, पूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने ग्रामीण भागातील महिलांना आरोग्याच्या सेवा मिळत होत्या. परंतु, आता येथे येणाऱ्या महिला रुग्णांना नाईलाजास्तव दुसऱ्या शासकीय रुग्णालयात रेफर करावे लागत आहे. यात गरीब महिला रुग्णांची तारांबळ होऊन आर्थिक ओढाताण होत आहे.
विशेष म्हणजे, दुसऱ्या महिला वैद्यकीय अधिकारी आरोग्याच्या कारणावरून रजेवर होत्या. त्यांची रजा संपली तरी त्या अद्याप रूजू झाल्या नाहीत. त्यामुळे एकाच डॉक्टरवर अधिक ताण पडत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण रुग्णालयात अन्य तीन पुरुष वैद्यकीय अधिकारी असून, वेळप्रसंगी त्यांना आरोग्य सेवा द्यावी लागत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे बाह्यरुग्ण तसेच आंतररुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषत: महिला रुग्णांची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत प्रतिनियुक्तीचा कालावधी संपुष्टात येऊनही तज्ज्ञ डॉक्टर रूजू होत नसल्याने महिला रुग्णांतून नाराजी व्यक्त होत आहे.