जळकोट शहरात तलाठ्यांनी आपापले खाजगी कार्यालये सुरू केली आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या कामासाठी आता तालुक्याला यावे लागत आहे. गावपातळीवर तलाठी कार्यालय असल्याने तलाठी मात्र त्या-त्या मुख्यालयी आढळून येत नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड हाेत आहे. शासनाने नियुक्त केलेल्या गावातच तलाठ्यांनी वास्तव्य करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. मुख्यालयी उपस्थित राहून नागरिकांसह शेतकऱ्यांची कामे तेथेच करावीत, असेही निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, तलाठी आपल्या सज्जाच्या ठिकाणी राहत नसल्यानेच शेतकरी, गावकऱ्यांची गैरसाेय हाेत हाेती.
जळकाेट येथे थाटण्यात आलेल्या खाजगी जागेतील कार्यालयांना मनसेच्या वतीने साेमवारी टाळे ठोकण्यात आले. सदरचे आंदोलन मनसेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी बाळासाहेब शिवशेट्टी, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष महेश देशमुख, शहराध्यक्ष वीरभद्र धूळशेटे, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष शुभम चंदनशिवे, गजानंद पदमपल्ली, अंकुश नागपुर्णे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित हाेते.