हरभरा पिकाला हमीभाव केंद्रावर प्रतिक्विंटल पाच हजार १०० रुपये दर आहे; तर मार्केट यार्डामध्ये चार हजार ६७० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. हमीभाव केंद्रापेक्षा मार्केट यार्डात कमी किंमत मिळत असताना केवळ पेरणी तोंडावर असल्याने शेतकरी बाजारात हरभऱ्याची विक्री करीत आहेत. त्यानुसार मंगळवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये १० हजार ४०२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. मार्केट यार्डात कमाल चार हजार ८००, तर किमान चार हजार ५९० आणि सर्वसाधारण चार, हजार ६७० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. जो की हमीभाव केंद्रापेक्षा कमी आहे.
लातूर बाजारातील शेतमालाची आवक
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी गूळ २१७, गहू ८४५, जवारी हायब्रीड ३५, ज्वारी रब्बी ३७१,ज्वारी पिवळी १५, तूर ३६१६, मूग २२९, करडी ७४, सोयाबीन ३१०८ क्विंटल आवक होती.
सोयाबीनचा दर हमीभावपेक्षा अधिक
सोयाबीनला मात्र सुरुवातीपासूनच हमीभाव केंद्रापेक्षा अधिक भाव मिळत आहे. सोयाबीनचा हमीभाव तीन हजार ८७० रुपये आहे; तर मार्केट यार्डामध्ये तब्बल सात हजार ५० रुपये दर मिळत आहे. मागील अनेक वर्षांमध्ये या वर्षी उच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला मार्केट यार्डात पसंती दिली आहे. मंगळवारी मार्केट यार्डात सोयाबीनला प्रतिक्विंटल सात हजार २६५ रुपये कमाल; तर सहा हजार ५४० रुपये किमान आणि सात हजार ५० रुपये सर्वसाधारण दर होता. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी सोयाबीन आणि हरभरा पिकाची विक्री मार्केट यार्डात करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे.