मागील १५ दिवसांपासून शासनाने लॉकडाऊन उठविला आहे. त्यामुळे प्रवाशांची पुणे आणि मुंबईकडे जाण्याची लगबग सुरू झाली आहे. उदगीर व परिसरातील मजूर, नोकरदार, विद्यार्थी हे पुणे, मुंबईकडे जाण्याची संख्या अधिक आहे, हे लक्षात घेऊन प्रशासनाने बिदर-मुंबई व हैदराबाद-पुणे या दोन्ही रेल्वे नियमित स्वरूपात सुरू करण्याची मागणी उदगीर रेल्वे संघर्ष समितीने बिदरचे खासदार भगवंत खुब्बा, राज्यमंत्री संजय बनसोडे, दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्या व विभागीय व्यवस्थापक अभयकुमार गुप्ता यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष
रेल्वे सेवा बंद झाल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी दर वाढविले आहेत. उदगीरहून ३५ पेक्षा अधिक खासगी ट्रॅव्हल्स बस पुणे, मुंबईला धावतात. मात्र, रेल्वे प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. लोकप्रतिनिधीही त्याची दखल घेत नसल्याची तक्रार उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी केली आहे.