उदगीर : उदगीर येथील सामान्य रुग्णालयात कोविडच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्याचा अनेक दिवसांपूर्वी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पाठपुरावा केल्याने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंजुरी दिली असून राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी/ जिल्हा नियोजन समितीतून २० लाखांचा निधी उपलब्ध करून घेण्यास मान्यता दिली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे. जिल्ह्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था या एकाच ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. उदगीर हे लातूरपासून ८० किमीवर व कर्नाटकाच्या सीमेवर आहे. त्यामुळे उदगीरात घेण्यात आलेले नमुने लातूरला पाठविण्यात येतात. परंतु, सध्या तपासणी होऊन अहवाल प्राप्त होण्यासाठी वेळ लागत आहे. दरम्यान, उदगीर येथे आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्तावही काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आला होता. या प्रयोगशाळेच्या मंजुरीसाठी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे प्रयोगशाळेस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
ही प्रयोगशाळा उदगीरच्या सामान्य रुग्णालयात कार्यान्वित करण्यासाठी व त्यासाठी आवश्यक तांत्रिक, अतांत्रिक पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे, तसेच प्रयोगशाळेसाठी लागणारी यंत्रसामग्री व १० हजार चाचण्यांसाठी लागणाऱ्या कंझ्युमेबल्ससाठी अंदाजे ९९ लाख ३३ हजार ८५१ रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.
लवकरच प्रयोगशाळा सुरू होणार...
उदगीरात आरटीपीसीआर चाचणीसाठीच्या प्रयोगशाळेचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आला होता. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून उदगीर व जळकोट तालुक्यातील नागरिकांच्या सोईसाठी सततच्या पाठपुराव्यामुळे या प्रयोगशाळेसाठी मंजुरी मिळाली आहे. लवकरच येथून कोविड अहवाल मिळणार आहे. यापूर्वी आपण उदगीरात ऑक्सिजन टँकची उभारणी करून तो कार्यान्वित केला. ऑक्सिजन निर्मिती प्लांटची रक्कम कंपनीला देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हे काम पूर्ण होईल. त्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. उदगीर मतदारसंघातील नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत आरोग्यविषयक सेवा पूर्णपणे उपलब्ध करून दिल्या जातील, असे राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले.