जळकोटातील तालुका क्रीडा संकुलासाठी दोन हेक्टर म्हणजेच ५ एकर जमीन यापूर्वी हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यासाठी यापूर्वी १० लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र, ते इतरत्र वळविण्यात आले होते. ही बाब लक्षात घेऊन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला. क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी शासनाच्या क्रीडा विभागाने ५ कोटी ५८ लक्ष ५० हजारांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील क्रीडाप्रेमींतून समाधान व्यक्त होत आहे.
या अनुदानातून २०० मीटर धावण्याचा पथ, विविध खेळांचे मैदान तयार करण्यात येणार आहे. तसेच संरक्षक भिंतीचे बांधकाम, संकुलातील अंतर्गत रस्ते, पाण्याची व्यवस्था, विद्युतीकरणाचा अंदाजपत्रकात समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील क्रीडाप्रेमींना तालुका क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी अन्य तालुक्यात जाण्याची गरज भासणार नाही. हे अंदाजपत्रक तालुका क्रीडा अधिकारी बाळासाहेब केंद्रे, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी शासनाला पाठवून दिले होते. त्याला राज्याच्या क्रीडा व युवक सेवा विभागाच्या प्रभारी आयुक्तांनी १२ एप्रिल रोजी प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी दिली आहे.
क्रीडाप्रेमींतून समाधान...
तालुका क्रीडा संकुलाच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाल्याने तालुक्यातील क्रीडाप्रेमींतून समाधान व्यक्त होत आहे. या मान्यतेचे पत्र मिळताच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील दळवे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, दस्तगीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष संग्राम पाटील हसुळे, नगरसेवक महेश धुळशेट्टे, नितीन धुळशेट्टे, धनंजय भ्रमण्णा, माधव दिलमिलदार, गोविंद भ्रमण्णा, चेअरमन अशोक डांगे, मुमताज शेख, गजानन दळवे, श्याम डांगे यांनी राज्यमंत्री बनसोडे यांचे कौतुक केले.