वीज बिलाची वसुली थांबविण्याची मागणी
लातूर : कृषी पंपाच्या वीज बिल वसुलीचे नियम पायदळी तुडवून महावितरणकडून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. यामुळे रब्बी पिकांना शेतकऱ्यांना पाणी देता येत नाही. वसुलीचा कुठलाच नियम पाळला जात नाही. बिलाचा कुठलाही निकष लावला जात नाही. एका एचपीला एक हजार याप्रमाणे तीन एचपीला ३ हजार, ५ एचपीला ५ हजार अशी मनमानी रक्कम वसूल केली जात आहे. ती थांबविण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी केली आहे.
कोरोना रुग्णांना मदत करावी
लातूर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे केले तर सामान्य लोकांची उपासमार होण्याची शक्यता जास्त आहे. शिवाय, कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते. कोरोना रुग्णांच्या दवाखान्याचा खर्च शासनाने करावा, अशी मागणी रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात रामभाऊ कोरडे, राजहंस धसवाडीकर, कबीर मस्के, विनोद खांडके, भारत गडेराव, अक्षय शृंगारे, शहाजी गायकवाड, कपिल गायकवाड, दीपक तलवार यांनी केली आहे.
राज्य पाठ्यपुस्तक भांडारातील व्यवहार तीन दिवस बंद
लातूर : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र, बालभारती कार्यालयातील पुस्तके, कागद व छापील साहित्याची मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत लातूर भांडारातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्राचे प्रभारी भांडार व्यवस्थापक एस.आर. खुर्दे यांनी केले आहे.
शहराध्यक्षपदी परमेश्वर शिंदे
लातूर : डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या लातूर शहराध्यक्षपदी परमेश्वर शिंदे यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे, युवक अध्यक्ष रोहन लोंढे, जिल्हाध्यक्ष पिराजी साठे यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली. या वेळी विशाल कांबळे, नवनाथ वाघमारे, प्रतीक सूर्यवंशी, आदित्य कांबळे, नागेश गव्हाणे, दयानंद संमुखराव आदींची उपस्थिती होती.