तालुक्यातील अजनी (बु.) येथे पाणीपुरवठा योजना सुरू असून, गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, प्रभाग क्र. २ मधील पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला महिनाभरापासून गळती लागली आहे. परंतु, त्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याने प्रभाग क्र. २ मध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. विंधन विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. कोरोनाच्या संकटात संसर्गाची भीती नाकारता येत नाही. प्रभाग क्र. २ मधील नागरिकांनी ग्रामपंचायतीस निवेदन देऊन तत्काळ जल योजनेची गळती बंद करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. निवेदनावर नारायण सूर्यवंशी, अशोक चात्रे, सूर्यकांत पांचाळ, विश्वंभर शिंदे, गोविंद ठाकूर, मारोती ठाकूर, केशव मादलापुरे, दिलीप चात्रे, बळवंत मादलापुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पाणीपुरवठा सुरळीत होईल...
अजनी (बु.) चे ग्रामसेवक सुनील कांबळे म्हणाले, नवीन जलवाहिनी टाकताना जुनी पाइपलाइन फुटली होती. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.