अहमदपूर पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली असून, तीनशे हॉर्सपॉवरचे तीन पंप लिंबोटी धरणावर बसविले असून, ते कार्यरतही केले होते. मात्र, पाणी पातळी कमी झाल्याने चालू असलेल्या दोन पंपात दगडगोटे व गाळ अडकल्याने नवीन पंप नादुरुस्त झाले. त्यामुळे जुन्या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा केला जात असून, त्यामुळे वीस दिवसाआड आलेला पाणीपुरवठा २५ ते ३५ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र अभूतपूर्व पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हे पंप दुरुस्तीसाठी मागील आठ दिवसांपासून अहमदाबाद येथे कंपनीकडे पाठवले असून, आणखी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी त्यासाठी लागू शकतो. जुन्या पाईपलाईनवर अधिकचा भार आल्यामुळे पाणीपुरवठा अंतर वाढले आहे. सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी दोन महिन्यांवर कालावधी लागणार आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व कंत्राटदार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेले आश्वासन फोल ठरले आहे. काम संथ गतीने केल्याच्या कारणावरून एक जानेवारीपासून प्रतिदिन ३ हजार ७५० रु.प्रमाणे सहा लाख चाळीस हजार रुपयांचा दंड कंत्राटदाराला आकारण्यात आला आहे. यापूर्वीही कंत्राटदाराला अकरा लाख रुपयांचा दंड आकारला होता. मात्र, कामाच्या वेगावर त्याचा परिणाम झाला नाही. याबाबत आमदार बाबासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी समवेत बैठक घेऊन सुरळीत पाणीपुरवठा विषयी निर्णय होणार असल्याचे नगरसेवक अभय मिरकले, रवी महाजन, फुजैल जहागीरदार, संदीप चौधरी, भैया भाई सरवर लाल यांनी सांगितले.
पाणीपुरवठ्यबाबत बैठक
शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा झाला पाहिजे, यासाठी अनेक बैठका घेतल्या. यावेळेसही प्रशासन व कंत्राटदार समवेत बैठक घेऊन कामास गती देण्यात येणार असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले .
नवीन फिल्टरशिवाय सुरळीत पाणीपुरवठा नाही
सद्य:स्थितीत जुन्या फिल्टरची क्षमता ४० लाख लिटर प्रतिदिन आहे. मात्र, नवीन फिल्टर झाल्यानंतर ९० लाख लिटर प्रतिदिनप्रमाणे शहरास पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नव्या फिल्टरच्या कामाशिवाय सुरळीत पुरवठा होऊ शकणार नसल्याचे नगर परिषदचे पाणीपुरवठा अभियंता गणेश पुरी यांनी सांगितले. फिल्टर कामासाठी आणखी दीड महिना लागणार असल्याचे एमजेपीचे उपअभियंता विकास बडे यांनी सांगितले.