लातूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागामध्ये सद्यस्थितीत ९७२ चालक कार्यरत आहेत. यातील २५ वर्षे सेवा झालेल्या २३ जणांनी विनाअपघात प्रवासी ने-आण करण्याचे कर्तव्य बजावले आहे. तर सेवानिवृत्त झालेल्या अन्य २३ जणांनी विनाअपघात सेवा दिली आहे.
निलंगा आगारातील वाय.डी. कांबळे आणि संजय मसलगे या दोन चालकांची तर ३० वर्षे सेवा झाली आहे. आता दोघेही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. विनाअपघात सेवा दिल्याबद्दल त्यांना नुकतेच गौरविण्यात आले. सद्यस्थितीत २३ जण विनाअपघात सेवा दिलेले चालक आहेत. तर २०१४ पूर्वी २३ जणांनी विनाअपघात कर्तव्य बजावले होते. विनाअपघात सेवा बजावलेल्या सर्व चालकांचा महाराष्ट्र दिनी महामंडळाकडून गौरव होणार असल्याचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले.
अपघाताचे तीन प्रकार महामंडळाकडून नोंदविले जातात. मरणांतर, गंभीर आणि किरकोळ. या तिन्ही प्रकारांत प्रस्तुत २३ चालकांचा समावेश नाही. साधा किरकोळ अपघातही या २३ चालकांकडून झालेला नाही. दरम्यान, गतवर्षी लाॅकडाऊन असल्यामुळे फक्त ४६ अपघात एसटी महामंडळाच्या चालकांकडून झाले आहेत. यात मरणांतर चार ते पाच अपघात असून, उर्वरित सर्व अपघात किरकोळ स्वरुपाचे आहेत. तथापि, एसटीचा प्रवास सामान्यांसाठी सुखकर आहे.
एस.टी. महामंडळामध्ये ३१ वर्षांपासून सेवा बजावत आहे. जूनमध्ये सेवानिवृत्ती आहे. शांत, संयम ठेवून गाडी चालविल्यास अपघात होत नाही. घरातील काही तणाव असतील तर ते विसरून कामावर आले पाहिजे. त्यासाठी शांत आणि संयम राखायला हवा. तरच आपण विनाअपघात सेवा देऊ शकू. अनेक चालकांच्या घरगुती समस्या असतात. त्या तणावातच ड्युटीवर आल्यावर लक्ष विचलित होऊन अपघात होऊ शकतात. नव्या चालकांनी आमच्या अनुभवाचा हा मंत्र ध्यानी घ्यावा.
- वाय.डी. कांबळे, निलंगा आगार
२९ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा चालक म्हणून मी कार्यरत आहे. सहा महिन्यानंतर मी सेवानिवृत्त होत आहे. महामंडळातील २९ वर्षे आणि त्यापूर्वी मी गाडी चालवीत आहे. बस किंवा गाडीमध्ये जे प्रवासी आहेत, ते आपले कुटुंब आहे. या कुटुंबाचा सुरक्षित प्रवास झाला पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे या भावनेतून मी दररोज ड्युटी करतो. एस.टी.ची स्टेअरिंग हातात घेताच हीच भावना दररोज होते.
- संजय मसलगे, निलंगा आगार