औसा (जि. लातूर) : काचेची बाटली फोडून त्याच्या साहाय्याने स्वत:च्या पाेटावर वार करून घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी जुना सेलू रोड औसा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी औसा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी सदर व्यक्तीने कुटुंबीयांना फोन करून मला शोधू नका, मी तुम्हाला भेटणार नाही, असे म्हटले होते.
अनंत तातेराव शिंदे (५०, रा. कळमगाव, ता. शिरूर अनंतपाळ) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, औश्यापासून ५ किमी अंतरावरील जुन्या सेलू रस्त्यावरील कारंजे खडी केंद्रानजीक गुरुवारी दुपारी ते शुक्रवारी सकाळच्या दरम्यान मानसिक तणावातून अनंत तातेराव शिंदे यांनी काचेची बाटली फोडून त्याच्या साहाय्याने स्वत:च्या पोटावर वार करून घेतले. त्यात अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी मयताचे चुलत भाऊ राजेंद्र शिंदे (रा. कळमगाव, ता. शिरूर अनंतपाळ, ह.मु. लातूर) यांच्या फिर्यादीवरून औसा पोलिस ठाण्यात शुक्रवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक डाके हे करीत आहेत.
मला शोधू नका, मी तुम्हाला भेटणार नाही...आत्महत्येपूर्वी अनंत शिंदे यांनी कुटुंबीयांना व्हिडीओ कॉल केला होता. मला शोधू नका, मी तुम्हाला भेटणार नाही, असे घरच्या मंडळींना सांगितले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.