जिल्ह्यात आतापर्यंत १९६.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शंभर ते सव्वाशे मीमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. तरीपण पाऊस पडण्याचे संकेत मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही भागात पाऊस आहे तर काही भागात पाऊस नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात सर्वदूर सारखा पाऊस होत नसल्यामुळे काही भागात पेरणे आहे तर काही भागात पेरण्या नाहीत, अशी स्थिती आहे. ६ लाख १३ हजार ४२१ हेक्टरपैकी ४ लाख ३२१ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक सोयाबीनचा पेरा १ लाख ८० हजार हेक्टरवर झाला आहे. उर्वरित क्षेत्रावर मूग, उडीदचा पेरा झाला आहे. आणखी दोन लाख हेक्टरवर पेरणी झालेली नाही. एक-दोन दिवसात मोठा पाऊस झाल्यानंतर पेरण्याला सुरुवात होईल. मात्र सध्या काही भागात पाऊस नसल्याने चाढ्यावरची मूठ थांबली आहे. रेणापूर, औसा, निलंगा, देवणी तालुक्यातील काही भागातच पेरण्या सुरू आहेत, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस...
जिल्ह्यात आतापर्यंत १९६.६ मी मी पाऊस झाला आहे.
त्यात लातूर तालुक्यात १७६, अहमदपूर २२५, निलंगा १३६, उदगीर २७३, चाकूर २०८, रेणापूर २१४, शिरूळ आनंतपाळ १३७, आणि जळकोट तालुक्यात २५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार दीडशे ते एकशे सत्तर मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यानुसार शेतकरी पेरते झाले आहेत; परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाने ताण दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता आहे.