लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, शनिवारी २,३९३ व्यक्तींच्या स्वॅबची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बाधितांचा आलेख ९१ हजार ७१९वर पोहोचला असून, आतापर्यंत ८९ हजार १३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १७१ रुग्ण उपचाराधिन असून, कोरोनाने आतापर्यंत २,४१६ रुग्णांचा बळी घेतला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शनिवारी ९८० व्यक्तींच्या स्वॅबची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर १,४१३ जणांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये पाचजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही चाचण्या मिळून २५ नव्या बाधित रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१८ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ३,७१५ दिवसांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर २.६ टक्के असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने २७ जणांना रुग्णालय प्रशासनाकडून सुट्टी देण्यात आली.
२३९३ चाचण्यांत २५ बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:22 IST