लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, ग्रामीण भागात बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण अल्प आहे. सद्यस्थितीत १५ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले असून, ४९ गावांमधील ७४ रुग्ण विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाकडून दररोज १५०० ते २००० व्यक्तींच्या चाचण्या केल्या जात आहेत. काेरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन गरजेचे आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ६४ हजार ९५३ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, यामध्ये ३६ हजार १८५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४ लाख ४५ हजार १६६ व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजन चाचणी करण्यात आली असून, त्यामध्ये ५५ हजार ५६२ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही चाचण्या मिळून ९१ हजार ७४७ रूग्ण आतापर्यंत आढळले आहेत. यापैकी ८९ हजार १७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत उदगीर तालुक्यातील ७, जळकोट ३, देवणी १ तर औसा तालुक्यातील ४ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तर अहमदपूर तालुक्यातील १, औसा तालुका २१, देवणी १, लातूर तालुका १९, निलंगा तालुका ५ तर उदगीर तालुक्यातील एका गावात कोरोना रुग्ण आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाकडून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन चाचण्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाला रोखलेली गावे...
तालुका गावे
उदगीर - रुद्रवाडी, वागदरी, शेल्हाळा तांडा, हाकनाकवाडी तांडा, पीरतांडा
जळकोट - येवरी, धनगरवाडी, सोरगा
देवणी - धनेगाव तांडा
औसा - आलमला तांडा, तोंडवळी, भंगेवाडी, नांदूर्गा तांडा
या गावांत कोरोनाचे रुग्ण...
तालुका गावे
औसा - बोरफळ, गंगाखेडा, औसा तांडा, किल्लारी
लातूर : कानडी बोरगाव, सारसा, गातेगाव, खंडापूर
निलंगा - गौर, डांगेवाडी, औराद शहाजानी, गिरकसाळ
रेणापूर - मुसळेवाडी, फर्दापूर
दररोज दोन हजारांवर चाचण्या...
जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि शहर महापालिकेच्यावतीने विविध केंद्रांवर दररोज १ हजार ५०० ते २ हजार व्यक्तींच्या चाचण्या केल्या जात आहेत तसेच बाधित रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७ टक्क्यांवर असून, चाचण्यांवर अधिक भर दिला जात आहे.