देवणी तालुक्यात १ एप्रिल ते ३० जून या तीन महिन्यांच्या कालावधीत पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पंचायत समिती, तहसील कार्यालय व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार तालुक्यातील काही गावे, वाड्या व तांडे अशा एकूण २१ गावांसाठी जवळपास २७ विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहण करण्यात येणार आहेत. त्यासाठी जवळपास १४ लाख ५८ हजारांची तरतूद करण्यात आली आहे.
तालुक्यातील धनेगाव तांडा, अनंतवाडी, दवणहिप्परगा, टाकळी, बोरोळ, गुरदाळ, कमरोद्दीनपूर, विळेगाव, राम तांडा, लक्ष्मण तांडा, नेकनाळ, देवणी खु., वलांडी, नागतीर्थ वाडी, चवणहिप्परगा, सय्यदपूर, ममदापूर व कवठाळा आदी गावांत संभाव्य पाणीटंचाई जाणविण्याची शक्यता असल्याने हा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
तालुक्यातील ज्या-ज्या गावांत मनरेगा योजनेअंतर्गत विहिरी खोदण्यात आल्या आहेत आणि तिथे पाणी असेल तर तेथून गावात पाणी आणण्यासाठी जलवाहिनी व इतर खर्च हा शासन स्वतः करून देणार असल्याची माहिती येथील गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली. संबंधित ग्रामपंचायतींनी मनरेगा अंतर्गतच्या विहिरींचे काम त्वरित पूर्ण करावे, असे आवाहनही केले.