अहमदपूर : सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गरजूंना विविध योजनेअंतर्गत धान्य पुरवठा केला जातो. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव एका ठिकाणी धान्य न मिळाल्यास ते ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून धान्य मिळण्यासाठी पोर्टेबिलिटी लागू झाली आहे. तालुक्यातील १ हजार ६२२ कार्डधारकांनी त्याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे या कार्डधारकांना कुठेही धान्य मिळण्याची सोय झाली आहे.
सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीअंतर्गत अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व शेतकरी लाभार्थी अशा पद्धतीमध्ये धान्य वितरित केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्डधारकांना मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यात गहू, तांदूळ, साखर, डाळ, तेल आदी वस्तुंचा समावेश होता.
अहमदपूर तालुक्यात १६५ स्वस्त धान्य दुकानदार असून कार्डधारकांची संख्या ३९ हजार ८११ आहे. लाभार्थ्यांची संख्या २ लाख १४ हजार ४०९ आहे. त्यात अंत्योदयमध्ये ४ हजार १७६ कार्ड असून २२ हजार १२३ लाभार्थी आहेत. प्राधान्य कुटुंबात २८ हजार ७७० कार्ड असून १ लाख ५५ हजार ७१० लाभार्थी आहेत. शेतकरी लाभार्थ्यांत ६ हजार ८६५ कार्ड असून ३७ हजार ५७६ लाभार्थी आहेत. गत महिन्यात यातील १ हजार ६२२ कार्डधारकांनी पोर्टेबिलिटी वापर केला असून त्यांना राज्यातच नव्हे तर देशात कोठेही धान्य मिळू शकते. पोर्टेबिलिटीमध्ये अहमदपुरात १८०, शिंदगीत १०४, सय्यदपूर येथे ७७ कार्डधारक असून या गावांनी अधिक पोर्टेबिलिटीचा वापर केला आहे, असे पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार जी.आर. पेड्डेवाढ, पेशकार बी.जी. मिठेवाड, डी.बी. निलावार यांनी सांगितले.
तक्रार निवारणासाठी पर्याय...
रेशन दुकानदार धान्य वेळेवर न देणे, धान्य कमी देणे, दुकान वेळेत उघडे न ठेवणे, यादीतील नावात बदल अशा तक्रारी असतात. त्यासाठी पोर्टेबिलिटी हा पर्याय राहणार आहे. कोणत्याही कार्डधारकांची कुठल्याही रेशन दुकानदाराविषयी तक्रार राहणार नाही.
- प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार.
स्थलांतरितांसाठी उपयुक्त...
सदर पोर्टेबिलिटी सर्वत्र लागू झाली असून स्थलांतरित मजूर, ऊसतोड कामगार, बाहेरगावी राहणारे लाभार्थी हे आपल्या कार्डआधारे कोठेही धान्य घेऊ शकतात. त्यामुळे त्यांची सोय होणार आहे.
- महेश सावंत, सहाय्यक पुरवठा अधिकारी