राम मगदूम - गडहिंग्लज -लिंगनूर काा नूल (ता. गडहिंग्लज) येथील जवान सुनील शंकर जोशीलकर यांना सैन्यात कर्तव्य बजावताना जम्मू-काश्मीर येथे अंगावर झाड कोसळून अपघाती वीरगती मिळाली. या घटनेस सहा दिवस उलटले तरी त्यांचे राहते घर असलेल्या ‘यमुना’नगरात अजूनही सन्नाटाच आहे. वीर जवान सुनील यांच्या आजी स्व. यमुनाबाई विराप्पा जोशीलकर यांना रामू, भीमराव, हणमंत, शंकर, विठ्ठल, आण्णाप्पा व चन्नाप्पा अशी सात मुले आणि इंदुबाई व गंगुबाई या दोन मुली. वडिलार्जित तुटपुंजी शेती व शेतमजुरीवरच या कुटुंबाची गुजराण. यमुनाबार्इंच्या एका मुलासह हा नातवंडे देशसेवेसाठी सैन्यात गेली, हे या कुटुंबाचे वेगळेपण.घरची गरिबी असली तरी जोशीलकर भावंडांची एकी तीन पिढ्यांपासून अभेद्य आहे. त्यांनी स्व. शामगोंडा पाटील यांची जागा घेऊन एकाच ठिकाणी सर्वांसाठी घरे बांधली. एकाच खुटाची ७-८ घरे झाल्यामुळे ती जोशीलकरांची गल्ली झाली. गावकऱ्यांनी या गल्लीला ‘यमुनानगर’ असे नाव ठेवले आहे.बुधवारी (दि. ७) सुनील यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी त्याच दिवशी दुपारी गावात समजली. त्यांची पत्नी संध्या त्यावेळी गर्भवती असल्यामुळे त्यांच्या कुटुंबापर्यंत ही दु:खद बातमी पोहोचू नये याची खबरदारी तमाम गावकऱ्यांनी घेतली होती.मात्र, सुनील यांचे पार्थिव गावात येताच जोशीलकर कुटुंबीयांसह गावकऱ्यांच्या दु:खाचाही बांध फुटला. दु:खाची बातमी कळल्यापासून सांत्वनासाठी येणाऱ्यांची रीघ लागली आहे. यमुनानगरसह गावभर श्रद्धांजलीचे फलक लागले असून, संपूर्ण गावासह यमुनानगरवरील शोककळा कायम आहे. दरम्यान, १०९ टी. ए. बटालियनचे कर्नल अलेक्स मोहन व त्यांच्या पत्नी रूबी यांनी जोशीलकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि तातडीची मदत म्हणून दोन लाखांचा धनादेश दिला.देशसेवेचा वसायमुनाबाई यांचा मुलगा चन्नाप्पा हे माजी सैनिक असून, त्यांचा मुलगा विकास, शंकर यांचा मुलगा सुनील व महेश, मुलगी इंदुबाई यांचा मुलगा महादेव हे माजी सैनिक असून त्यांचा मुलगा दीपक हादेखील सैन्यातच आहे. यमुनाबार्इंचा पुतण्या केदारी यांचा मुलगा महादेव हादेखील सैन्यात आहे. त्यांची एकूण अर्धा डझन नातवंडे देशसेवेत आहेत. त्यापैकी सुनील यांना नुकतीच वीरगती आली.
‘यमुना’नगरात अजूनही सन्नाटाच !
By admin | Updated: January 13, 2015 00:05 IST