कागल / मुरगूड : यमगे (ता. कागल) येथील मच्छिंद्र नारायण गुरव (वय २१) या युवकाने कर्जाला कंटाळून कागल येथील लक्ष्मी टेकडीवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. कागल पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्या अशी नोंद असली तरी मच्छिंद्रच्या घरच्यांनी त्याचा घातपात झाला असल्याची शक्यता वर्तविली आहे. यमगेमध्ये मच्छिंद्र हा आपल्या आईबरोबर राहत होता. गेल्या सहा ते सात वर्षांपासून तो कागल येथील पंचतारांकित एमआयडीसीमध्ये वर्धमान टेक्स्टाईल या कंपनीत नोकरीस होता. तीन वर्षांपूर्वी त्याला कंपनीने नोकरीत कायम केले होते. मच्छिंद्र गुरव याने घरखर्च व आईच्या आजारपणासाठी काही बँकांमधून तसेच खासगी सावकारांकडूनही कर्ज घेतल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी त्याने तवेरा गाडीही घेतली होती. गुरुवारी तो कंपनीमध्ये कामास गेला होता. त्यादिवशी त्याने अर्धा दिवस रजा घेऊन बँकेत कर्जप्रकरणी आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही केल्याचे समजते. शुक्रवारीही मच्छिंद्रने वैयक्तिक काम आहे, असे सांगून अर्धा दिवस रजा घेऊन तो कंपनीतून बाहेर पडला होता. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास मच्छिंद्रच्या नातेवाइकांना अनोळखी फोनद्वारे त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यावेळी त्याचे कुटुंबीयांनी कंपनी परिसरात व लक्ष्मी टेकडीच्या परिसरात जाऊन त्याची शोधाशोध करून रात्री उशिरा घरी परतले. पुन्हा सकाळी लक्ष्मी टेकडीवर शोध घेतला असता दाट झाडीमध्ये दोरीच्या साहाय्याने मच्छिंद्रने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी तत्काळ कुटुंबीयांनी कागल पोलीस ठाण्यात संपर्क साधला. घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर दुपारी कागलमध्ये मच्छिंद्रचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मच्छिंद्रचा मोबाईल फोन, त्याचे पाकीट तसेच ओळखपत्रही मृतदेहाजवळ आढळून आले नाही. तसेच निर्मनुष्य ठिकाणी त्याने आत्महत्या केली असताना शुक्रवारी ही माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीला कशी समजली? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मच्छिंद गुरव याची आत्महत्या ही घातपात असण्याची शक्यता त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे. मच्छिंद्रच्या आत्महत्येमुळे गुरव कुटुंबियांचा आधार तुटला आहे. त्याच्यामागे भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
यमगेच्या युवकाची आत्महत्या
By admin | Updated: September 27, 2015 00:27 IST