कोल्हापूर : ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली, त्यांच्या ६ जूनच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची आता जगभर उत्सुकता लागून राहिली आहे. हे तमाम शिवभक्तांचे यश आहे. ज्या रायगडावर ७५ वर्षात सव्वा कोटी रुपयेही खर्च झाले नव्हते. तेथे आता कोट्यवधी रुपयांची संवर्धनाची कामे सुरू आहेत. यंदाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयारीबाबतच्या अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे यांनी दिली.भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात रविवारी सायंकाळी झालेल्या समितीच्या पदाधिकारी आणि शिवभक्तांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी संयोगिताराजे छत्रपती, ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा.डॉ.वसंतराव मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
संभाजीराजे म्हणाले, आज अमेरिकेतही शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे. सुरुवातीला या सोहळ्याला सहकार्यासाठी प्रशासनही तयार नसायचे, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. हा सोहळा साजरा करताना ‘माझा गड माझी जबाबदारी’ ही संकल्पना शिवभक्तांची राबवावी. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, अध्यक्ष संदीप खांडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. फत्तेसिंह सावंत यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संजय पवार, प्रसन्न मोहिते, शाहीर दिलीप सावंत, आझाद नायकवडी, अतुल माने, इंद्रजीत जाधव, प्रवीण हुबले, सुखदेव गिरी, देवेंद्र भोसले, राहुल शिंदे, विजय ससे, सागर पाटील, शिवाजी कोगिलकर, उदय घोरपडे, धैर्यशील पोवार, विकास देवाळे, विजय आग्रवाल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यातील अनेकांनी उपयुक्त सूचना केल्या. संयोजनासाठी ४० समित्या करण्यात आल्या आहेत.
तिथीवाल्यांशीही मी चर्चा केलीसंभाजीराजे म्हणाले, या सोहळ्याची सुरुवात करताना मी पुण्यामध्ये तिथीनुसार सोहळ्याचा आग्रह धरणाऱ्यांनाही चर्चेसाठी बोलावले होते. तारखेनुसारचा हा सोहळा जगभरात जावा, लोकोत्सव व्हावा, हीच माझी भावना होती. या बैठकीत मतैक्य झाले नाही, परंतु आज ६ जूनला किल्ल्यावर येणाऱ्या पाच लाखांहून अधिक शिवभक्तांमुळे हा सोहळा लोकोत्सव झाला आहे.
६ जूननंतर वाघ्या कुत्र्याचे मी पाहतोसध्या आपल्यासमोर ६ जूनचा सोहळा यशस्वी करण्याचे उद्दिष्ट आहे. ते पूर्ण झाल्यानंतर रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं काय करायचं ते मी पाहतो, असेही संभाजीराजेंनी यावेळी सांगताच शिवभक्तांनी टाळ्यांचा कडकडाट केला.