कोल्हापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शुक्रवारी ११११ फूट तिरंगा पदयात्रा काढली. या पदयात्रेत ११२५ युवती सहभागी झाल्या होत्या.जागतिक महिला दिनानिमित पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी ही ११११ फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.देश हमे देता है सब कुछ, हम भी कूछ देना सिखे असा राष्ट्रभक्तीचा संदेश देत आणि एक कदम जवानों के लिए, एक कदम देश के लिए अशा संदेश फलकासह भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत ही पदयात्रा शहरातील उभा मारुती चौक येथून निघाली. पोलिस उपअधिक्षक प्रेरणा कट्टे आणि विद्यार्थी परिषदेच्या प्रांत विद्यार्थिनी प्रमुख केतक कोळेश्वर यांनी या पदयात्रेचे उद्घाटन केले.
यावेळी देशाप्रती विद्यार्थ्यांमध्ये संवेदना निर्माण करण्याचे काम विद्यार्थी परिषद करते आहे, ही तिरंगा पदयात्रा याचाच एक भाग असल्याचे सांगून अभाविपच्या महाराष्ट्र प्रांत विद्यार्थिनी प्रमुख केतकी कोळेश्वर यांनी विद्यार्थिंनींना स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या मिशन साहसी उपक्रमातून ६ मार्च रोजी देशभरात १0 लाख विद्यार्थिंनीना प्रशिक्षण दिल्याची माहितीही दिली.