राम मगदूम -- गडहिंग्लज नगरपालिकेतील विषय समित्यांच्या सभापती निवडीत ‘समझोता’ करून सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही ‘समित्या’ वाटून घेतल्या. सत्तेसाठी झालेला हा ‘समझोता’ आणि ‘एकजूट’ शहराच्या विकासात दिसणार का? अशी चर्चा शहरवासीयांत आहे.चार वर्षांपूर्वी झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य आघाडीचा पाडाव करून राष्ट्रवादी सत्तेत आली. ‘जनता दल-जनसुराज्य’ला ८, तर ‘राष्ट्रवादी’ला ९ जागा मिळाल्या. मात्र, अंर्तगत मतभेदामुळेच जनतेने दिलेली सत्ता राष्ट्रवादीला पाच वर्षे टिकविता आली नाही.काठावरील बहुमतामुळे नगरपालिकेतील सत्तांतराचे कवित्व गेली दोन वर्षे सुरूच राहिले. गतवर्षीच्या विषय समित्यांच्या निवडीच्यावेळी सत्ता आणि बहुमत असतानाही केवळ सभापतिपदासाठी नामनिर्देशनपत्रे भरताना केलेल्या चुकीमुळे बांधकाम व वाचनालय या दोन समित्यांच्या सभापतिपदावर राष्ट्रवादीला पाणी सोडावे लागले. तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी जनता दल दोघांनीही गतवर्षीच्या विषय समित्यांच्या निवडीला आव्हान दिल्यामुळे बांधकाम आणि वाचनालय ही दोनही सभापतिपदे वर्षभर रिक्तच राहिली. सत्ता असूनही राष्ट्रवादीला आपल्या नगरसेवकांना सभापतिपदाची संधी देता आली नाही.राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजीचा लाभ उठवत जनता दलाने सहा महिन्यांपूर्वीच पुन्हा पालिकेचीच सत्ता ताब्यात घेतली. महिला व बालकल्याण सभापती सुंदराबाई बिलावर यांनीच नगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या विरोधात बंडखोरी केल्यामुळे वर्षभर समित्यांच्या बाहेर राहिलेल्या राष्ट्रवादीला पालिकेच्या सत्तेवरही पाणी सोडावे लागले.सध्या केवळ नाममात्र उपनगराध्यक्षपदच राष्ट्रवादीकडे आहे. काठावरील बहुमतामुळे एक समिती विरोधकांना मिळतेच. त्यानुसार वाचनालय समिती आता राष्ट्रवादीला मिळाली आहे. यावर्षीच्या विषय समित्यांच्या निवडीत सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही एकत्र बसून सामोपचाराने तोडगा काढल्यामुळेच प्रत्येक समितीमध्ये विरोधकांनाही प्रतिनिधित्व मिळाले आहे. एका अर्थाने सत्तेत सहभाग आणि काम करण्याची संधीच विरोधकांनाही मिळाली आहे. सत्तेसाठी झालेली ही एकजूट शहराच्या विकासात दिसावी एवढीच शहरवासीयांची अपेक्षा आहे.जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्याची संधी!हद्दवाढीला मंजुरी मिळविणे, रिंगरोडची कामे मार्गी लावणे, सांडपाणी व कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे, अतिक्रमणे हटवून शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे आणि नागरिकांना वाहतूक सुरक्षिततेची हमी देणे, महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास, सुसज्ज नाट्यगृह बांधकाम, प्रांतकचेरीसाठी भाड्याने दिलेली जागा परत मिळविणे आणि नगरपालिका शाळांची पटसंख्या वाढविणे हे शहरातील प्रमुख प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. निवडणुकीत दोनही आघाड्यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिलेली ही आश्वासने आहेत. एकजुटीने या वचनांची पूर्तता करण्याची संधी आता मिळाली आहे.
सत्तेचा समझोता विकासात दिसणार का ?
By admin | Updated: December 21, 2015 00:33 IST