सदाशिव मोरे, आजरा: मडिलगे ( ता.आजरा ) येथे चौघा सशस्त्र दरोडेखरांनी माजी उपसरपंच सुशांत गुरव यांच्या घरावर दरोडा टाकून त्यांची पत्नी पूजा गुरव यांचा निर्घुण खून केला आहे. ही घटना रविवारी पहाटे २.३० वा. सुमारास घडली.दरोडेखोरांच्या हल्ल्यात सुशांत गुरव जखमी झाले. दरोडेखोरांनी पूजा यांच्या गळ्यातील दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची फिर्याद सुशांत गुरव यांनी आजरा पोलिसात दिली. उत्तूरची लक्ष्मी यात्रा व मडिलगे येथे पडलेला दरोडा यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरोडा की खून या अनुषंगाने पोलिसांचा तपास वेगाने सुरु आहे.
सुशांत गुरव यांचे गावात मध्यवस्तीत गुरव गल्लीत घर आहे. ते वारकरी आहेत. पती-पत्नी आचारी म्हणून काम करत असत. त्यामुळे तालुक्यात परिचित आहेत.. रात्री दीड वाजता डोके दुखत असल्याने सुशांत गुरव उठले तर पत्नी पूजा यांना पित्ताचा त्रास होत असल्याने त्या ही जाग्या झाल्या. दोघेही गोळी घेऊन परत झोपले. दरम्यान २.३० वाजण्यास सुमारास सुशांत गुरव बाथरूमला गेले असताना चौघे दरोडेखोर घरात घुसले. त्यांनी दरवाजाला कडी घालून पूजा गुरव यांच्या तोंडावर रुमाल दाबून धरून गळ्यातले सोने व पैसे काढून घेतले यावेळी त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. त्यामुळे त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.
सुशांत गुरव बाथरूममधून दरवाजा मोडून घरात आले. त्यावेळी एका दरोडेखोराने सुशांत यांना मारहाण केली. दरोडेखोर पळून जाताच सुशांत याने मुलगा सोपान व मुलगी मुक्ता या दीड वर्षाच्या मुलांना घेऊन दारात येऊन आरडाओरड केली. ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले. घटनास्थळी पहाटे ७.३० वाजता श्वान पथकाला आणले. स्टेला हे श्वान घरातभोवती फिरून तिथेच घुटमळले. घटनास्थळावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी दरोडा की खून या अनुषंगाने तपासास सुरुवात केली आहे.