कोल्हापूर : निधी खर्चच करायचा नसेल तर मागता तरी कशाला, अशा भाषेत उद्वेग व्यक्त करत पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा परिषदेला खडे बोल सुनावले. मार्चपर्यंत कोणत्याही परिस्थितीत निधी खर्च करावा अशा कडक सूचनाही पदाधिकारी, अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी ९५ कोटींच्या अतिरिक्त मागणीसह ४८४ कोटींच्या जिल्हा वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झाली. पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला खा. संजय मंडलीक, खा. धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई, नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. प्रकाश आबीटकर, आ. ऋतुराज पाटील, आ. राजू आवळे, आ. प्रकाश आवाडे, आ. राजेश पाटील, जि.प. अध्यक्ष बजरंग पाटील, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, जि.प. सीईओ संजयसिंह चव्हाण, जिल्हा पाेलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीने गेल्या वर्षी तयार केलेल्या आराखड्यातील ४४८ कोटी २१ लाखांची रक्कम शासनाकडून प्राप्त झाली. तथापि डिसेेंबरअखेर त्यापैकी केवळ ४८ कोटी रक्कम वितरित झाली आहे. त्यातही २९ कोटी ८० लाखांचाच खर्च झाला आहे. केवळ ६.६४ टक्के खर्च झाल्याने बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. निधी वर्षाच्या सुरुवातीऐवजी शेवटी मिळत असल्याने अडचणी येत असल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले; पण निधी वाटपावरून पदाधिकाऱ्यांकडून असलेल्या उदासीनतेबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यातच सदस्यांनी निधी वाढवून देण्याची मागणी केल्यानंतर तर पालकमंत्र्यांनी आधी दिला आहे, तो खर्च करून दाखवा, अशा शब्दांत खडे बोल सुनावले.
चौकट ०१
प्रत्येक तालुक्यात आपत्कालीन संदेश यंत्रणा
नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे आपत्तीकाळात जलद मदत व प्रतिसादासाठी आपत्कालीन संदेश यंत्रणा बसवण्याचा निर्णय झाला. त्याला भरीव निधी देण्याचेही ठरले.
चौकट ०२
रस्ते खुदाईवरून आवाडे व इचलकरंजी मुख्याधिकाऱ्यांत वाद
इचलकरंजीत नव्याने डांबरीकरण केलेले रस्ते गॅस पाइपलाइनसाठी उकरून खड्डे तसेच ठेवल्यावरून आ. प्रकाश आवाडे व इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यात जोरदार वाद झाला. मुख्याधिकाऱ्यांच्या खोट्या माहितीमुळे आवाडे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने बैठकीतील वातावरण तणावपूर्ण बनले. बुधवारी बैठक लावण्याचे पालकमंत्र्यांची सांगितल्यानंतर वाद निवळला.
चौकट ०३
सदस्यांनी मांडले प्रश्न
पांडुरंग भांदीगरे : दुधाळ योजनेतून कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांना वगळण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्या.
मनोज फराकटे : सांडपाणी स्वच्छता प्रकल्पासाठी जागेचा प्रश्न असल्याने घनकचरा क्लस्टर तयार करून द्यावे.
जीवन पाटील : पूरग्रस्त भागातील शाळांच्या दुरुस्तीसाठी ३० कोटींचा निधी द्यावा.
विजय बोरगे : समाजकल्याणमधील साकवची थकीत देणी अदा करावीत.
चौकट ०४
खासदारांच्या सूचना
खा. संजय मंडलिक यांनी पुण्याच्या धर्तीवर १०० कोटींचा निधी देऊन कोल्हापुरातील प्राधिकरणालाही निधी देऊन सक्षम करावे, अशी सूचना केली. खा. धैर्यशील माने यांनी आयजीएम रुग्णालय ४०० बेडचे करावे, ग्रामीण रुग्णालयांना साधने आणि स्टाफ पुरवून बळकटीकरण करावे, कोविड काळात कंत्राटी तत्त्वावर काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार सेवेत कायम करावे, इंटरनेट, गॅस लाइन टाकण्यासाठी रस्ते खुदाई करणाऱ्या पोटठेकेदारावर रस्ते दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करावी, असे सुचविले.
चौकट ०५
नावीन्यपूर्ण योजनांना मान्यता
ई-फेरफारसाठी ४५२ तलाठ्यांना ड्युप्लेक्स प्रिंटर देणे.
कीड नियंत्रणासाठी मित्र किडींचे उत्पादन व वाटप करणे.
सार्वजनिक आरोग्यासाठी घर माशींचे नियंत्रण करणे.
वळीवडे येथील पाेलंडवासीय वास्तूच्या संग्रहालयात तिकीट व व्यवस्थापन, प्रदर्शन हॉल बांधणे.
तालुका न्यायालयात सीसीटीव्ही बसवणे.
शिवाजी विद्यापीठ हायवे कॅन्टीन ते डीओटीपर्यंत सायकल ट्रॅक.
तहसील कार्यालयात व्हीसी रूम तयार करणे.
दिव्यांगांना क्रीडा साहित्य उपकरणे देणे.
सेनापती कापशी येथे वॉटर मीटर बसवणे.