सदाशिव मोरे
आजरा : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी आजरा तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. १९८७ पासून सहा वेळा ‘गोकुळ’वर निवडून आलेले विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे यांची उमेदवारी सत्तारूढ गटातून निश्चित आहे. निवडणुका आल्या की वेगवेगळ्या जाजमावर बसणारे नेतेमंडळी यावेळी आपटे यांच्या पालखीचे भोई होणार की, विरोधात शड्डू मारणार ? याबाबत चर्चेचे गुन्हाळ सुरूच आहे. विरोधी गटाच्या उमेदवारीवरून अंतर्गत खलबते जोरदार सुरू असून उमेदवारीत कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
तालुक्यात आजपर्यंत पक्षनिष्ठेऐवजी गटाला महत्त्व देणारी मंडळी आहेत. प्रत्येक निवडणुकीत सोयीची भूमिका घेतल्याने तालुक्याला तीन आमदार आहेत. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत आजपर्यंत सर्वच नेतेमंडळी रवींद्र आपटे यांच्या पाठीशी राहतात. त्यामुळे आपटे यांचा विजय प्रत्येकवेळी सुखकर झाला आहे. गेल्यावेळच्या निवडणुकीत विरोधी अंजना रेडेकर यांचा फक्त २५० मतांनी झालेला पराभव निष्ठावान कार्यकर्त्याला चटका लावणारा ठरला. ‘गोकुळ’साठी २३३ ठरावधारक दूध संस्था आहेत. रवींद्र आपटे यांनी आजपर्यंत दूधवाढीसाठी वासरू संगोपान, संस्थांच्या इमारती, मिल्कोटेस्टर, संगणकीकृत दूध संस्था, तालुक्यातील नोकरभरती यासह ‘गोकुळ’च्या सर्व योजना दूध संस्थांना मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली आहे, तर अंजना रेडेकर यांनी आजरा-गडहिंग्लज-चंदगड तालुक्यांत संस्थांचे ठराव करण्यापासून मोर्चेबांधणी केली आहे. अभिषेक शिंपी यांनीही उमेदवारीसाठी मेळावा घेऊन नेत्यांचे लक्ष वेधले आहे, तर राष्ट्रवादीशी निष्ठा ठेवून वसंतराव धुरे यांनी आजपर्यंत काम केले आहे. ‘गोकुळ’पाठोपाठ जिल्हा बँक, साखर कारखाना, तालुका संघ यासह गावपातळीवरील सेवा संस्था, दूध संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने सर्वांनीच सावध पवित्रा घेतला आहे.
* आपटेंचा प्रवास
संचालक, अध्यक्ष ते महानंदचे उपाध्यक्ष
रवींद्र आपटे हे ‘गोकुळ’वर सहा वेळा निवडून आले. ते संचालक ते ‘गोकुळ’चे अध्यक्ष झाले. त्यांना महानंदचे उपाध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली.
--------------------------
* इच्छुकांची संख्या वाढली
सत्तारूढ गटाकडून रवींद्र आपटे यांची उमेदवारी निश्चित आहे. तरीही भाजपाकडून अशोक चराटी, काँग्रेसकडून अंजना रेडेकर, अभिषेक शिंपी, राष्ट्रवादीकडून वसंत धुरे, मुकुंद देसाई इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीत कोण बाजी मारणार ? यावरच तालुक्याच्या राजकरणाची दिशा ठरणार आहे.
--------------------------
* आपटेंच्याविरोधातील सर्वजण एकत्र
स्व. शिवपुत्रअण्णा शेणगावे, वसंतराव धुरे, उदयराज पवार, अंजना रेडेकर यांनी ‘गोकुळ’साठी राजकीय भवितव्य आजमावले. मात्र, त्यांना यश आले नाही. हे सर्वजण चालू वेळेच्या निवडणुकीत आपटे यांच्याविरोधात एकत्र आले आहेत.