रमेश पाटील - कसबा बावडा -तब्बल एक लाखांहून अधिक मेट्रिक टन ऊस पिकविणाऱ्या कसबा बावड्यातील शेतकऱ्यांना परिसरातील पाणंदी गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका, साखर कारखाना आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून दुरुस्ती होत नसल्यामुळे आम्हाला वाली कोण? असा प्रश्न पडला आहे.ग्रामीण भागातील पाणंदींची दुरुस्ती जिल्हा परिषदेमार्फत केली जाते. काही ठिकाणी त्या-त्या भागातील साखर कारखानेही पाणंद दुरुस्तीची कामे हाती घेतात. त्यामुळे दर दोन तीन वर्षांनी खडी, मुरुम टाकून पाणंदीची दुरुस्ती होते. जिल्हा परिषदेचे सदस्यही आपला काही फंड या कामावर खर्च करतात. त्यामुळे ग्रामीण भागात गळीत हंगामास उसाची वाहतूक सुलभ होते.परंतु, कसबा बावड्याची परिस्थिती नेमकी उलटच आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत बावडा येत असल्यामुळे जिल्हा परिषद बावड्यातील पाणंदी दुरुस्ती करू शकत नाही. राजाराम कारखाना (शुगर मिल) जेव्हा खासगी मालकांचा होता तेव्हा काही प्रकरणात कारखान्याकडून पाणंदीची दुरुस्ती होत होती. त्यातच आता ऊस झोन बंदी उठल्यामुळे कोणताही शेतकरी कोणत्याही कारखान्याला ऊस पाठवीत असल्यामुळे कारखाने पाणंदी दुरुस्तीवर फारसे लक्ष देईनात. राजाराम साखर कारखानाही याला अपवाद नाही. आता राहिला प्रश्न महापालिकेचा. मुळातच महापालिका शहरातील रस्ते करताना फंड नाहीत अशी कारणे असतात. त्यामुळे पाणंदी दुरुस्तीसाठी ती पैसे खर्च करू शकत नाही. पाणंदी दुरुस्ती करा म्हणून एखाद्या नगरसेवकाला कोणी शेतकऱ्यांनी विनंती केली तर शहरातील रस्ते दुरुस्त करायला पैसे नाहीत, तर पाणंद दुरुस्ती लांबच असा उलटच प्रश्न नगरसेवकांचा असतो.शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मला बावड्याच्या समस्येची जाण आहे. बावड्यातील पाणंदी दुरुस्तीची आपण लवकरच कामे हाती घेणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होईल. काही पाणंदीची कामे पूर्ण केली जातील, तर काही पाणंदी योग्य त्या प्रकारे दुरुस्त केल्या जातील.- राजेश क्षीरसागर, आमदार बावड्यातील सरवळ परिसरातील सरवळ पाणंद, सुतार तळी पाणंद, तसेच चौगले पाणंद, रणदिवे पाणंद, माळी पाणंद, रेडेकर पाणंद या व अन्य पाणंदीची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पाणंदी खराब असल्याने गळीत हंगामात उसाची वाहतूक करताना अडचण येते.- सुरेश शंकरराव पाटील,शेतकरी, कसबा बावडा
बावड्यातील शेतकऱ्यांना वाली कोण ?
By admin | Updated: December 2, 2014 00:21 IST