राम मगदूम - गडहिंग्लज -सात वर्षांत सातवेळा प्रदूषित पाण्याचे नमुने तपासण्यात आले. दोनवेळा प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष स्थळ भेटी झाल्या. नांगनूरनजीक हिरण्यकेशी नदीतील पाणी पिण्यासाठी अयोग्य व असुरक्षित असल्याचे अहवाल शासकीय विविध प्रयोगशाळांनी दिले; परंतु नदीचे पाणी प्रदूषित करण्यांविरूद्ध अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. आठवड्यापूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नांगनूरनजीक ओढा व नदीतील दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. तपासणीसाठी हे नमुने चिपळूण येथील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल मिळायला महिनाभराची प्रतीक्षा आहे. मात्र, नदीत पाणी असूनही, ते दूषित झाल्यामुळे प्यायला पाणी नाही, अशी विचित्र अवस्था असल्यामुळे पंचक्रोशीतील जनतेत तीव्र संतापाची भावना आहे.नार्वेकरांची लढाई... अन् पंचक्रोशीची एकजूटनांगनूरचे माजी उपसरपंच स्व. मनोहर नार्वेकर यांनी नांगनूरसह पंचक्रोशीतील जनतेला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, म्हणून एकांड्या शिलेदाराप्रमाणे शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. प्रदूषण मंडळ व कारखान्याबरोबरच अधिकारी, आमदार-खासदारांशीही पत्रव्यवहार केला. हिरण्यकेशीत मळी मिश्रित पाणी सोडणे बंद न झाल्यास कोर्टात खेचण्याचा लेखी इशारादेखील त्यांनी संकेश्वर साखर कारखान्याला दिला होता. अलीकडे दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांचा लढा पुढे नेण्यासाठी आता नांगनूरसह अरळगुंडी, कडलगे व इदरगुच्ची ग्रामस्थ एकत्र आले आहेत. यापूर्वीचे रिपोर्ट काय सांगतात ?फेब्रुवारी २००८ : राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या पाणी गुणवत्ता अहवालानुसार पाणी रासायनिकदृष्ट्या पिण्यासाठी अयोग्य व असुरक्षित आहे. - गटप्रमुख, जिल्हा सुलभीकरण गट, कोल्हापूर.३० एप्रिल २००८ : स्थळ पाहणीवेळी नदीच्या पाण्याला कोणताही रंग अथवा वास आढळला नाही. - अजित सराफ , प्रादेशिक अधिकारी (समन्वय), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई.२८ जानेवारी २००९ : पाण्यात अमोनिया, नायट्रेटस्, आॅक्सिजन, दुर्गंधी व गढूळपणा अधिक असल्यामुळे जवळपास पर्यायी जलस्त्रोत उपलब्ध नसल्यास पाण्यावर योग्य प्रक्रिया व निर्जंतुकीकरण करूनच पिण्यासाठी वापरावे. - कनिष्ठ संशोधक अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, कोल्हापूर.११ नोव्हेंबर २००९ : रासायनिकदृष्ट्या पाणी पिण्यास योग्य आहे. मात्र, निर्जंतुकीकरण करून वापरावे. - कनिष्ठ संशोधक अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, कोल्हापूर३ फेब्रुवारी २०११ : पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा पाणी नमुन्याचा सूक्ष्म जीविय अहवाल.- कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, कोल्हापूर.
प्रदूषण मंडळ कारवाई करणार कधी ?
By admin | Updated: November 28, 2014 23:43 IST