जयसिंगपूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या सांगली-कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चाचे जयसिंगपुरात स्वागत करण्यात आले. या रॅलीमध्ये सुमारे दोनशेहून अधिक ट्रॅक्टर घेऊन शेतकरी सहभागी झाले होते.
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ट्रॅक्टर रॅली मोर्चा काढून केंद्र शासनाचा निषेध नोंदविला. या मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सोमवारी सकाळी जयसिंगपूर शहरातील विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी येथील क्रांती चौकामध्ये एकत्र जमले होते. ही ट्रॅक्टर रॅली सांगली येथून सुरू करून अंकली-उदगाव आणि जयसिंगपूर-हातकणंगलेमार्गे कोल्हापूरकडे रवाना झाला. ही रॅली जयसिंगपुरात आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून ढोल-ताशांच्या निनादात या रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅलीचे स्वागत उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, नगरसेवक राहुल बंडगर, संभाजी मोरे, अमरसिंह निकम, सदाशिव पोपळकर, सुभाष भोजणे, बंडा मिनियार, धनाजी देसाई, पराग पाटील, तेजस कुराडे, गणेश तावडे, सौरभ पाटील, रघुनाथ देशिंगे, रमेश शिंदे यांनी केले.
रॅलीत सावकर मादनाईक, नगरसेवक शैलेश चौगुले, सागर मादनाईक, शैलेश आडके, शंकर नाळे, मिलिंद साखरपे यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो - २५०१२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील क्रांती चौकात स्वाभिमानीच्या वतीने काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीचे स्वागत करण्यात आले.