कोल्हापूर : सरसकट दुकाने सुरू झाल्यानंतर वीकेंड लॉकडाऊनचा पहिलाच दिवस पावसाचाच राहिला. सकाळी लॉकडाऊनचा विसर पडल्यासारखी रस्त्यावर गर्दी दिसत होती. दुपारनंतर मात्र जोरदार पावसाने सक्तीने सर्व व्यवहार थांबवावे लागले.
कोल्हापुरात सोमवार ते शुक्रवार निर्बंध शिथिल केले होते. सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत सरसकट दुकाने सुरू राहिल्याने कोल्हापूर शहरातील जनजीवन सुरळीत झाले होते. शुक्रवारी मुदत संपल्यावर आणि शनिवार रविवार कडक वीकेंडचा नियम असल्याने त्याची प्रशासनाने अंमलबजावणी केली; पण पाच दिवस बाहेर पडण्याची सवय लागल्याने शनिवारी दुकाने बंद आहेत याचाच बहुतेकांना विसर पाडल्यासारखे वाटत होते.
पोलिसांचीही कुठेही तपासणी बंदोबस्त नसल्याने नागरिक निवांत फिरत होते. अत्यावश्यक बरोबरच इतर दुकानेदेखील बऱ्यापैकी सुरू होती, जी बंद होती तीदेखील मागील दाराने सुरू होती. त्यासाठी दुकानदारांनी रिकाम्या दुकानासमोर कामगारांना गिऱ्हाईकांना माहिती देण्यासाठी बसविले होते. भाजीपाला चार वाजता बंद करण्याचा नियम असतानादेखील बऱ्याच ठिकाणी संध्याकाळीदेखील सुरूच होती. हॉटेलसह इतर पार्सलची चहाची, वडा भजीची दुकानेदेखील बिनधास्त सुरू होती.