कोल्हापूर : चित्रपटाला समाजिक प्रतिष्ठा नव्हती अशा काळात ज्यांनी केवळ कला जिवंत ठेवण्यासाठी अव्यहातपणे प्रयत्न केले त्या वयोवृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असला तरीही ही वाढ कमीच आहे. कलावंतांची ही थट्टा असल्याची टीका वयोवृद्ध कलाकारांमधून होत आहे. राज्यातील चित्रपट कलावंतांना राज्य सरकारतर्फे मानधन देण्यात येते. त्यासाठी अ, ब, क अशा तीन प्रकारांत वर्गवारी करण्यात आली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात एवढे तुटपुंजे मानधन वाढविल्याबद्दल कलावंतांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. वाढीव मानधनात वृद्ध कलावंतांचा औषधपाण्याचाही खर्च त्यातून भागणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. मानधन मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी तर खूपच वेदनादायी आहेत. मानधन प्रत्येक महिन्याला मिळणे अपेक्षित असले तरी ते कधीही वेळेवर मिळत नाही. कधी तीन मंिहन्यांनी, तर कधी सहा महिन्यांनी मिळते. एकदा तर वर्षभर ते मिळाले नव्हते. या मानधनाबाबत पंचायत समिती कार्यालयात गेले तर नीट उत्तरेही मिळत नाहीत. मिळालेच तर पुढच्या महिन्यात चौकशी करा, असे उत्तर मिळते. त्यामुळे हेलपाटे मारायचे तरी किती असा प्रश्न कलावंतांसमोर आहे. कोणाला चालता येत नाही, कोणाला डोळ्यांनी दिसत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यातही धडपड, चाचपडत गेले तर पदरी निराशा पडते. कोणावर तरी उपकार करीत असल्याची भावना कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर असते. प्रत्येक वेळा मानधन मिळविण्यासाठी कलावंत जिवंत असल्याबद्दल हयातीचे दाखले मागितले जातात. साक्षात लाभार्थी गेला तरी हयातीचा दाखल लागतोच. मग त्यासाठी राजपत्रित अधिकाऱ्याला शोधणे आणि त्यांना तशी विनंती करणे या गोष्टी ओघाने येतात. राजपत्रित अधिकारीही त्यांच्या मर्जीनुसार ते दाखले देतात. त्यामुळे तेथेही वृद्ध कलावंतांची ससेहोलपट होत राहते. मराठी चित्रपट महामंडळाचे पत्र हयातीचा दाखला म्हणून घ्या, अशी विनंती केली असता तीही अमान्य करण्यात आली.राज्य सरकारने कलावंतांची थट्टाच चालविली आहे. एक तर मानधन कमी आहे. वेळेवर मिळत नाही. कधी मिळणार हे सांगण्यात येत नाही. हेलपाटे मारावे लागत आहेत. जिवंतपणीच हयातीचे दाखले मागितले जातात. सरकार निगरगठ्ठ झाले आहे, असेच खेदाने म्हणावे लागेल. - भालचंद्र कुलकर्णी, अभिनेतेकलावंत प्रकारसध्याचे मानधनझालेली वाढ‘अ’ वर्ग१४०० रुपये२१०० रुपये‘ब’ वर्ग१२०० रुपये१८०० रुपये‘क’ वर्ग१००० रुपये१५०० रुपये
वृद्ध कलकारांच्या नशिबी ‘मान’ देणारे ‘धन’ नाहीच!
By admin | Updated: August 13, 2014 23:36 IST