कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील संभापूर व कासारवाडी येथे लॉजिस्टिक पार्क, आय. टी. पार्क, इलेक्ट्रॉनिक्स पार्क असे अनुकूल व्यवसाय उभारणीसाठी शासन मदत करील, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
संभापूर, कासारवाडी येथील जमीन मालक एकत्र येत असून, २५० एकर पेक्षा अधिक नियोजित शहर करण्याचा विचार आहे. यासाठी शासनाने लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी खा. धैर्यशील माने यांनी मंत्री देसाई यांच्याकडे शनिवारी केली.
यावर, मंत्री देसाई म्हणाले, या जागेची पाहणी करण्यासाठी लवकरच कमिटीला पाठवून देऊ. उद्योग व्यवसायाला चालना मिळत असेल तर शासनामार्फत वेगवेगळ्या कंपन्यांनाही या जागेसाठी सुचवले जाईल. जर अशा मोठ्या टाऊनशिप तयार झाल्या तर रोजगार निर्मिती होऊन भागाचा विकास होईल व पूर्वनियोजित शहरांची निर्मिती केल्याने आजूबाजूच्या भागाची उन्नती होण्यास मदत होईल.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर, अनिल नानिवडेकर सूर्यकांत पाटील- बुद्धीहळकर, किरीट मेहता आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : हातकणंगले तालुक्यातील संभापूर व कासारवाडी येथे लॉजिस्टिक पार्क, आय. टी. पार्क, इलेक्ट्रॉनिक्स पार्क उभारणीस मान्यता द्यावी, या मागणीचे निवेदन खा. धैर्यशील माने यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना दिले. यावेळी राजेश क्षीरसागर, सूर्यकांत पाटील, अरुण दुधवडकर आदी उपस्थित होते. (फोटो-१३०२२०२१-कोल-हातकणंगले)