कागलमध्ये आघाडीचा मेळावा
कागल : गोकुळ दूध संघ
कागल
गवळीसुद्धा दर दहा दिवसाला दुधाचे बिल देतो. तुम्ही वेगळे काय करता. तुमचा कारभार एवढा चोख आहे म्हणता तर निवडणुकीला का घाबरत आहात. माझी मतदारांना विनंती आहे परिवर्तनाची योग्य वेळ आली आहे. गोकुळ दूध संघाची सत्ता द्या. दुधाला जादा दर आणि सेवा सुविधा तर देऊच; पण शेणा-मुतात राबणाऱ्या माता-भगिनींना सोन्याची भाऊबीज करू, असे प्रतिपादन ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागलमध्ये गोकुळ दूध संघ निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचारार्थ ते बोलत होते. पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, विजय देवणे, प्रवीणसिंह पाटील, नगराध्यक्षा माणिक माळी, युवराज पाटील, सर्व उमेदवार उपस्थितीत होते.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, महादेवराव महाडिक यांना आम्ही सतत टँकरबद्दल विचारत होतो. काल त्यांनी आपले ४० टँकर असल्याची जाहीर कबुली दिली. आता पुण्याची जावयाची एजन्सी माझीच असे म्हणतील. त्यांच्या घशातून दूध संघ काढून, तो सर्वसामान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा करण्यासाठीच आमची ही लढाई आहे.
यावेळी खा. संजय मंडलिक, विद्यमान संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांचीही भाषणे झाली. स्वागत भय्या माने यांनी केले. आभार राजेखान जमादार यांनी मानले.
पी. एन.पाटील यांनाही महत्त्व नाही..
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ही निवडणूक महाविकास आघाडीच्या वतीने लढवावी, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे पी. एन. पाटील यांच्या बरोबर चर्चाही सुरू होती. त्या चर्चेमध्ये मी म्हणालो होतो, पी. एन. साहेब तुम्ही म्हणता तसे होणार नाही. सत्तारूढ गटातील पॅनलमध्ये तुमचा वरचष्मा राहणार नाही. यावर अतिशय आत्मविश्वासाने आपण सांगेल तेच होईल, असे ते म्हणाले होते; पण सत्ताधारी गटाचे पॅनल जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी ज्या बातम्या दिल्या व वस्तुस्थिती पाहिल्यानंतर पॅनल रचनेत पी.एन. यांचा वरचष्मा नाही हे स्पष्ट झाले आहे.
ठरावधारकांकडून मोठा प्रतिसाद.....
मी सर्व मतदारांना फोन करून पॅनल विजयी करण्याची विनंती करीत आहे. बहुसंख्य ठरावधारक साहेब तुम्ही आमचे हे काम केले आहे, ते काम केले आहे याची परतफेड यानिमित्ताने करू, असे सांगतात. विरोधी पॅनलमधील फक्त मतासाठी येतील. मी आणि सतेज पाटील नेहमी तुमच्या सेवेसाठी हजर आहोत. गोकुळमधील उधळपट्टी, गाड्या, नोकरचाकर, दुधाच्या मलईबद्दल सतत चर्चा होते. आता हे सगळे बंद करण्याची ही संधी आहे.
२६कागल
फोटोओळी -
कागल- राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या प्रचार मेळाव्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंत्री सतेज पाटील, खासदार मंडलिक व मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र- संदीप तारळे-गलगले.