लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला दिल्लीमध्ये सन्मान मिळवून देण्यासाठी सतत झटणारा युवा नेता हरपल्याची भावना कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. आठ वर्षांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वतीने दुष्काळग्रस्तांना धान्य देण्यात आले, त्यांच्या हस्ते झेंडा दाखवून धान्याचे ट्रक रवाना करण्यात आले, त्यासाठी ते पहिल्यांदाच कोल्हापुरात आले होते.
कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने जिल्ह्यात कॉंग्रेस कार्यकर्त्यांना धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पंचायत समिती सदस्य ते खासदार असा प्रवास करणारे सातव यांचे पाय नेहमी जमिनीवर राहिले. अलीकडील दहा वर्षात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकारी म्हणून त्यांची देशभर ओळख होती. सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला ताकद देऊन त्याचा पक्षात सन्मान करण्याचा प्रयत्न सातव यांचा राहिला. त्यामुळेच कॉंग्रेसमधील तरुणांना ते आपलेसे वाटत होते.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या ६ मे २०१३ च्या वाढदिवसानिमित्त मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना धान्य देण्यात आले. त्यासाठी ते पहिल्यांदाच कोल्हापुरात आले होते.
कोट-
राजीव सातव यांच्याकडे कमालीची नम्रता होती. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकारी होते; मात्र त्यांनी कधीही मोठेपणा दाखवला नाही. पडद्यामागे राहून पक्ष वाढीसाठी खूप मेहनत घेतली. त्यांच्या जाण्याने माझ्यासह राज्याचे, कॉंग्रेस पक्षाचे नुकसान झाले. ते नेहमीच आमच्या सोबत राहतील.
- सतेज पाटील (पालकमंत्री, कोल्हापूर)
युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना माझी त्यांच्याशी भेट झाली. अतिशय आक्रमक, अभ्यासू वृत्ती असलेले ते नेते होते. कॉंग्रेस बळकटीसाठी त्यांनी प्रभावीपणे काम केले. सामान्य कुटुंबातील युवकांना काम करण्याची संधी देत. त्यांच्यामुळेच आपण येथेपर्यंत पोहोचलो.
- बाजीराव खाडे (राष्ट्रीय सचिव, अखिल भारतीय कॉंग्रेस)
फोटो ओळी : कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव हे ६ मे २०१३ ला पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी धान्य ट्रक रवाना कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आले होते. यावेळी मालोजीराजे छत्रपती, विश्वजीत कदम, नीलेश राणे, राजीव सातव, सतेज पाटील, संजय डी. पाटील, प्रतिमा पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-१६०५२०२१-कोल-राजीव सातव व राजीव सातव ०१) (छाया- राज मकानदार)