कोल्हापूर : पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यास अपयशी ठरल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेला दोन वेळा बॅँक गॅरंटीच्या जप्तीची नामुष्की पत्करावी लागली आहे. तरीही कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) सुरू करण्यात अपयश आले आहे. मागील आठवड्यात जयंती नाल्यातून पाणी थेट नदीत पाणी सोडल्यानंतर आता आडमार्गाने म्हणजेच प्रक्रिया केंद्राच्या पूर्वेकडील शेतातून पाणी नदीत सोडण्याचा उद्योग सुरू आहे. ऊसतोडणी तोंडावर आहे, लागणीचे दिवस आहेत, यातच शेतात गुडघाभर पाणी साचल्याने शेतकऱ्यांतून संतापाची लाट उसळली.न्यायालयाच्या दणक्यानंतर ३१ जानेवारी २०१५ पर्यंत २४ एमएलडीच्या प्रक्रियेच्या क्षमतेने सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यासाठी महानगरपालिकेची धावाधाव व्यर्थ ठरत आहे. एसटीपी सुरू होण्यास विलंब होऊ लागल्याने जयंती नाल्यातून दररोज ४६ एमएलडी सांडपाणी थेट नदीत सोडून दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने फौजदारीची नोटीस बजावल्यानंतर तत्काळ पाणी सोडणे बंद केले. इतक्या जलद नदीत मिसळणारे सांडपाणी बंद झाल्याने पर्यावरण तज्ज्ञांनाही धक्का बसला.मात्र, जयंती नाल्यातील पाणी पूर्ण क्षमतेने उपसा करून या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने केलेली चालूगिरी आता उघड झाली. नाल्यातून उपसा केलेले पाणी झूम प्रकल्पाजवळील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेले. मात्र, प्रक्रिया व त्यानंतर विल्हेवाटची सक्षम यंत्रणा नसल्याने प्रकल्पाशेजारील पाणंदीतून व शेतातून पाणी सोडण्याचा उद्योग महापालिकेतर्फे सुरू आहे.हे पाणी तत्काळ न थांबविल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. १महानगरपालिकेच्या सदोष यंत्रणेमुळे या परिसरातील शेतात दूषित पाणी येण्याचे प्रकार वारंवार घडतात. दूषित पाण्यामुळे येथील जमिनीचा पोतही बिघडू लागला आहे. या शेतातील उसाचा व गुळाचा स्तरही खालावत असल्याने दर मिळत नाही. महापालिकेच्या गलथानपणामुळे शेतकऱ्यांचे दीर्घकालीन नुकसान होत आहे.२शेतातील सर्व कामे या दूषित पाण्यामुळे आता लांबणीवर पडणार आहेत. तक्रार करूनही दाद दिली जात नाही. महापालिकेने योग्य बंदोबस्त करावा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे शेतकरी प्रभाकर मोरे यांनी सांगितले.
सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे पाणी शेतात
By admin | Updated: November 27, 2014 00:49 IST