: आजरा तालुक्यातील आंबेओहोळ पाटबंधारे प्रकल्पात २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच पाणीसाठा होत आहे. लाभक्षेत्रात आनंद तर बुडीत क्षेत्रातील नागरिक पुनर्वसनाअभावी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून आंबेओहोळ प्रकल्पास मंजुरी मिळाली. अनेक कृती समित्या स्थापन झाल्या. कृती समित्यांचे एकमत होत नसल्याने प्रशासन पुनर्वसनासाठी दिरंगाई करीत असल्यामुळे हा प्रकल्प कधी काम सुरू तर कधी बंद अशामुळे २२ वर्षे रखडला गेला.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नामुळे प्रकल्पाच्या कामास गती आली. गेली चार महिने प्रकल्पाचे काम दिवस-रात्र करण्यात येऊन घळभरणी करण्यात आली, तर दुसरीकडे मुश्रीफ यांनी पुनर्वसनासाठी वेगवेगळ्या बैठकांचा जोर सुरू केल्याने प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न सुटले. पण, काही प्रश्न अंधातरीच राहिले.
मुश्रीफ यांनी अधिकारी व प्रकल्पग्रस्त यांच्या बैठकातून घळभरणी करून पाणीसाठा करू द्या. शेवटच्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत प्रकल्पातून पाणीसाठा सोडला जाणार नाही, असा शब्द दिला. त्यामुळे प्रकल्पाच्या कामास चालना मिळाली.
प्रकल्पाची किरकोळ कामे अपूर्ण आहेत. वळीव पाऊस सुरू झाल्याने पूर्ण होऊ शकली नाहीत. मात्र, महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. सांडवा व कोल्हापूर पद्धतीचे ७ बंधाऱ्यांची कामे झाली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी शेतीसाठी सोडले जाणार असल्याचे लाभक्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.
प्रकल्पाची घळभरणी होणार नाही अशा संभ्रमावस्थेत धरण्रस्त होते. त्यामुळे बुडित क्षेत्रात नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी जमिनी कसण्यासाठी तयार केल्या होत्या. ऊस लागवडही केली होती. हजारो हेक्टर ऊस, झाडे पाण्याखाली गेल्याने धरणग्रस्त हळहळ व्यक्त करीत आहेत.
प्रकल्पात ३२ टक्के पाणीसाठा
धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने प्रकल्पात प्रथमच ३०० मि. ली. मीटर इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे प्रकल्पात पहिल्यांदाच ३२ टक्के पाणीसाठा आहे. १ टीएमसीचा प्रकल्प आहे.
न्याय केव्हा मिळणार ?
प्रकल्पात जमिनी जाऊन आम्ही भूमिहीन झालो आहोत. प्रकल्पात पाणीसाठा झाला यासाठी धरणग्रस्तांनी क्वचित प्रसंगी विरोध केला. आम्ही कायम साथ दिली. पाणीसाठा झाल्याने आमच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष होऊ नये हीच अपेक्षा.
- महादेव खाडे, धरणग्रस्त
--
उत्तूर विभागातील पाणीप्रश्न संपुष्टात
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शंभर टक्के पुनर्वसनाची जबाबदारी घेतल्याने प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळेल. प्रकल्पामुळे परिसरातील शेती सुजलाम सुफलाम् होतील. तसेच उत्तूर परिसरातील पाणीप्रश्न संपुष्टात येईल.
- काशिनाथ तेली, सरपंच, होन्याळी.
-----------------------------
* फोटो ओळी : उत्तूर (ता. आजरा) परिसरात साकारण्यात आलेल्या आंबेओहोळ प्रकल्पात यंदा पहिल्यांदा पाणीसाठ्यास प्रारंभ झाला. त्यामुळे अनेक पिढ्यान् पिढ्या जमीन कसून उदरनिर्वाह करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची शेती यंदापासून पाण्याखाली गेली आहे.
क्रमांक : १८०६२०२१-गड-०१