कोल्हापूर : सेंट्रल वॉरियर्स, जे. एम. टायगर्स यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत शहीद पोलीस सहआयुक्त अशोक कामटे यांच्या स्मरणार्थ आयोजित प्रीमिअर लीग हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर बावडा बायसन्सनेही विजय नोंदवला. लाईन बझार येथे सोमवारी सकाळच्या सत्रात पहिला सामना बावडा बायसन्स विरुद्ध पन्हाळा पँथर्स यांच्यात झाला. हा सामना बावडा बायसन्सने १-० असा जिंकला. सामन्यात ७ व्या मिनिटात सत्यजित सावंतने गोल नोंदवला. हाच गोल विजयी गोल ठरला. दुसरा सामना सेंट्रल वॉरियर्स विरुद्ध देवगिरी फायटर्स यांच्यात झाला. या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात सेंट्रल वॉरियर्सने २-१ अशी देवगिरीवर मात करीत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. वॉरियर्सकडून संजय बांडगळे, समीर भोसले यांनी, तर देवगिरीकडून नीलेश घाडगे यांनी गोल केले. दुपारच्या सत्रात जे. एम. टायगर्स विरुद्ध करवीर चॅलेंजर्स यांच्यात सामना झाला. हा सामना जे. एम. टायगर्सने ३-० असा जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. टायगर्सकडून विजय बंडागळे, रोहित संकपाळ, मयूर पाटील यांनी गोल नोंदवले.
वॉरियर्स, टायगर्स उपांत्य फेरीत
By admin | Updated: May 12, 2015 00:41 IST