कुरुंदवाड : येथील शिवतीर्थ चौकात संस्थानकालीन विहिरीभोवतालचे संरक्षित कठडे महापुरात कोसळले आहेत. या चौकात खाद्यपदार्थांचे ढकलगाडे आहेत. त्यामुळे सायंकाळी याठिकाणी आबालवृद्धांची गर्दी होत असते. गर्दीत अथवा अनवधानाने एखाद्याचा तोल गेल्यास विहिरीत पडून जीव जाऊ शकतो. पूर ओसरून महिना होत आला तरी या संरक्षित कठड्याकडे लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने शहरवासीयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे या कठड्याचे काम त्वरित करावे अशी मागणी होत आहे.
शिवतीर्थ चौकात शहराच्या प्रवेशद्वाराला दोन ऐतिहासिक टेहळणी बुरुजासह छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ अत्यंत आकर्षक पुतळा आहे. या पुतळ्याशेजारी शहराचे राजे अण्णासाहेब पटवर्धन यांनी शहराला पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून विहीर खोदली असून, संपूर्ण तळापासून दगडी बांधकामाची ही विहीर अत्यंत विस्तीर्ण आहे.
या विहिरीच्या उत्तरेला संरक्षक भिंत होती. काळाच्या ओघात या विहिरीचा वापर थांबल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
जुलैमध्ये आलेल्या महापुरात पाण्याच्या प्रवाहाने विहिरीच्या उत्तर बाजूची संरक्षक भिंत विहिरीत पूर्णत: कोसळली आहे. या पुतळ्याशेजारी अनेक व्यावसायिकांनी शिवतीर्थ चौपाटी म्हणून खाऊगल्ली उभी केली आहे. दररोज सायंकाळी शेकडो आबालवृद्ध या चौपाटीकडे येतात. फूटपाथलगतच असलेल्या या विहिरीची कोसळलेली भिंत ही येथील पर्यटक आणि नागरिकांच्या जीविताला धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या भिंतीची पुनर्बांधणी करून संस्थानकालीन पटवर्धन सरकारच्या लौकिकाचा हा ऐतिहासिक ठेवा नव्याने जतन करावा, अशी आग्रही मागणी होत आहे.
फोटो - २००८२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - कुरुंदवाड येथील शिवतीर्थ चौकातील संस्थानकालीन विहिरीचे संरक्षित कठडे पूर्णत: ढासळले आहेत.