राम मगदूम
गडहिंग्लज : मेडिकल सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडहिंग्लज शहरातदेखील कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना ऑक्सिजन बेडसाठी मोठी धावाधाव करावी लागत आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी निम्मे रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. एकीकडे उपचारासाठी ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठीची धडपड पहायला मिळते तर दुसरीकडे कोविड मृतांच्या अंत्यसंस्कारासाठीही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.
कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आली किंवा एचआरसीटीचा स्कोअर चिंताजनक वाटला तर लगेच ऑक्सिजन बेडचा शोध सुरू होतो. ऑक्सिजन बेड मिळेल त्या दवाखान्यात रुग्णाला दाखल केले जाते. त्यानंतर एक-दोन दिवसातच रेमडेसिविर आणि व्हेंटिलेटर बेड शोधण्याची जबाबदारी रुग्णांच्या नातेवाइकांवर येते.
दरम्यान, मोठ्या दवाखान्यात पेशंट हलविण्याचा सल्ला नातेवाइकांना दिला जातो. गोंधळलेले नातेवाईक आप्तस्वकीयांचा जीव वाचविण्याच्या तळमळीपोटीच डिस्चार्ज घेतात; परंतु दुसऱ्या दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच किंवा पोहचल्यानंतर २४ ते ४८ तासांत खेळ संपतो.
दरम्यान, अंत्यसंस्कार गावीच झाले पाहिजेत म्हणून काहीही करून मृतदेह पुन्हा गडहिंग्लजला आणले जात आहे; परंतु गडहिंग्लज शहराशिवाय चंदगड, गडहिंग्लज, आजरा, कागल व भुदरगड तालुक्यासह सीमाभागातील कोविड मृतांवर अंत्यसंस्कार गडहिंग्लज पालिकेच्या टीमवरही मोठा ताण येत आहे. एकावेळी केवळ चारच मृतदेहांवर अंत्यसंस्काराची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठीही प्रतीक्षा करण्याची वेळ नातेवाइकांवर येत आहे. कोविड रुग्णालये आणि स्मशानभूमीमध्येच कोरोनाचे गांभीर्य पहायला मिळते. बाकी सगळीकडे अलबेल असल्याचे दृश्यच कोरोना रुग्ण आणि मृत्यूदर वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.
ऑक्सिजन बेड हाच डॉक्टर..!
एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आली की, ऑक्सिजन बेडचीच शोधाशोध सुरू होते. त्या दवाखान्यात डॉक्टर कोण आहे, अनुभवी नर्सिंग स्टाफ आहे का ? हे पाहिलेच जात नाही. त्यामुळे ऑक्सिजन बेड मिळाला की रुग्णांचा आणि नातेवाइकांचा जीव भांड्यात पडतो. त्यामुळे ऑक्सिजन बेड हाच डॉक्टर झाला आहे.
... तर ऑक्सिजन बेड नाही..!
रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९० च्या खाली असेल तर त्याला ऑक्सिजन बेड मिळत नाही. त्याचे कारण म्हणजे त्याला दर मिनिटाला १५ लिटर ऑक्सिजन द्यावे लागते. ऑक्सिजनच्या टंचाईमुळेच गरजवंत रुग्णालाच ऑक्सिजन बेड नाकारले जात आहे. मृत्यूदर वाढण्यामागे हेच महत्त्वाचे कारण आहे.
आयसीयू बेड केवळ ४४
उपजिल्हा रुग्णालयासह कोविडवरील उपचाराची सोय असलेल्या खाजगी दवाखान्यात मिळून तालुक्यात सध्या ३८३ बेड आहेत; परंतु त्यापैकी आयसीयू बेड केवळ ४४ आहेत. व्हेंटिलेटर, हायफ्लो मशीन व ऑक्सिजनची कमतरता यामुळेच मृत्यूदर वाढत चालला आहे.
दिवसाला ४५००-९०००..पण..!
शासनाच्या निर्देशाप्रमाणे सोयी-सुविधानुसार दिवसाला ४५०० ते ९ हजार रुपये बिल आकारण्याची मुभा आहे; परंतु औषधी व अन्य चाचण्या यासाठीचा खर्च नातेवाइकांनाच करावा लागत आहे. त्यामुळे दवाखान्यांची बिले 'नियमानुसारच' असली तरी इतर खर्चाच्या भुर्दंडामुळे रुग्णाचे नातेवाईक मेटाकुटीला येत आहेत.
-----------------------
गडहिंग्लज तालुक्याची आकडेवारी :
१८ मे २०२१ अखेर
- एकूण रुग्णसंख्या : १७२१ (ग्रामीण १३१७, गडहिंग्लज शहर - ४०४) - बरे झालेले रुग्ण : १०३८ - अॅक्टिव्ह रुग्ण : ६१५
- मृत्यू : ६८