लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण ऑनलाईन सभेत सभासदांचा आवाज दाबला असून, सभा गुंडाळल्याचा आरोप संस्थेचे माजी अध्यक्ष रघुनाथ पाटील, एन. के. पाटील यांनी सभेनंतर केला; तर संस्थेची १२९ कोटींची वार्षिक उलाढाल झाली असून, सभासदांना १४ टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा अध्यक्ष शंकर पाटील यांनी केली.
‘कोजिमाशि’ पतपेढीची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. अध्यक्ष शंकर पाटील यांनी कामकाजाचा आढावा घेतला. व्यवस्थापक अभय व्हनवाडे यांनी अहवाल वाचन केले. ऑनलाईन सभा सुरू असताना काही सभासदांना ‘अनम्युट’ करत त्यांना बोलूच दिले नाही. याबाबत व्यवस्थापक व काही संचालकांना फोन करून जाब विचारल्यानंतर काही सभासदांना सहभागी करून घेतल्याचा आरोप होत आहे.
पतपेढीने ३२ कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून, १४ कोटींची गुंतवणूक केली आहे. सभासदांना सुविधा देण्यासाठी कटिबध्द असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. यावेळी संचालक व पतपेढीचे कर्मचारी उपस्थित हाेते. उपाध्यक्ष शिवाजी लोंढे यांनी आभार मानले.
७२ सभासदांच्या उपस्थितीत सभा होतेच कशी
पतपेढीचे २१७३ सभासद आहेत, ऑनलाईन सभेला केवळ ७२ सभासदच सहभागी झाले होते. अशाप्रकारची सभा होतेच कशी? त्यामुळे पोटनियम दुरुस्तीसह महत्त्वपूर्ण निर्णय या सभेत मंजूर करू नयेत, अशी मागणी सचिन पाटील, बी. बी. मिसाळ यांनी केली.